
गणपतीपुळे समुद्र किनारी आलेल्या बेबी व्हेलचा मृत्यू उपासमारीमुळे झाला असण्याची शक्यता
गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर वाहून आलेल्या बेबी व्हेलचा अखेर मृत्यू झाला. या माशाला वाचवण्यासाठी प्रशासनासह गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते.परंतू गुरुवारी पहाटे त्याने प्राण सोडले. दरम्यान, या बेबी व्हेलचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याचा प्राथामिक अहवाल समोर आला आहे.
सोमवारी (१२ नोव्हेंबर) गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्याजवळ ग्रामस्थांना व्हेल माशाचं पिल्लू बेशुद्ध अवस्थेत आढळून आलं होतं. या पिल्लाचं वय जवळपास ५ ते ६ महिने इतकं होतं. त्याची लांबी ३० फूट आणि वजन सुमारे ४ टन होतंवनविभागाकडून या व्हेल माशाला जिवंत ठेवण्यासाठी कसरत सुरू होती. शेकडो हातांनी तब्बल ४२ तास प्रयत्न करून त्याला जीवंत ठेवले.
बेबी व्हेलला जिवंत ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी अतोनात प्रयत्न केले. कापडामध्ये गुंडाळून त्याच्यावर दिवसभर पाण्याचा मारा केला जात होता. भरती सुरू झाल्यानंतर मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत या माशाला जेसीबीच्या सहाय्याने समुद्रात सोडण्यात आले होते.परंतू बुधवारी परत ते समुद्रकिनारी आले. यावेळी देखील प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करत त्याला समुद्रात सोडले. पण गुरुवारी सकाळी पुन्हा हा बेबी व्हेल समुद्रकिनारी आढळून आला. यावेळी त्याने जीव सोडलेला होता.
गुरुवारी दुपारी गोव्यातील एजन्सीकडून माशाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा व्हिसेरा राखून ठेवला आहे.व्हेलच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसले तरी उपासमारीने मृत्यू झाला असा प्राथमिक अंदाज आहे.
www.konkantoday.com