
*वानरे, माकडे पकडून अभयारण्यात सोडणार, १५ दिवसात मोहीम सुरू होणार*
__शेतीबागायतीसाठी उपद्रव ठरत असलेली वानरे, माकडे पकडून अभयारण्यात सोडण्याच्या योजनेसाठी निधी मंजूर झाला असून, येत्या पंधरा दिवसात या कामाला गोळपमधून सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती शेतकरी अविनाश काळे यांनी दिली.रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथील अविनाश काळे यांनी वानरे, माकडांच्या उपद्रवाबाबत सातत्याने आवाज उठवला आहे. त्यासाठी उपोषणही केले आहे. पंतप्रधान सडक योजनेच्या रस्ता भूमिपूजन कार्यक्रमासाठी पालकमंत्री उदय सामंत आलेले असताना काळे यांनी त्यांची भेट घेतली. वानरे, माकडे पकडून अभयारण्यात सोडण्यासाठी लागणाऱ्या निधीचा प्रस्ताव वनविभागाने दिला असल्याचे मंत्री सामंत यांनी त्यांना सांगितले. प्रायोगिक तत्त्वावर रत्नागिरी तालुक्यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजनमधून मंजूर केला असल्याचे आणि गोळपमधूनच काम सुरू होणार असल्याचे मंत्री सामंत यांनी त्यांना सांगितले. रत्नागिरी तालुक्याचा खर्च पाहून उर्वरित तालुक्यांसाठी निधी देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.www.konkantoday.com