
*अलोरे शाळेच्या ‘स्मृतिशलाका’ स्मरणिकेचे पुण्यात लोकार्पण*
____चिपळूण तालुक्यातील अलोरे येथील मोरेश्वर आत्माराम आगवेकर विद्यालय आणि सीए. वसंतराव लाड कनिष्ठ महाविद्यालय अलोरे (पूर्वाश्रमीचे अलोरे हायस्कूल अलोरे) शाळेच्या १५२ रंगीत पानांसह ४३२ पानी ‘स्मृतिशलाका’ स्मरणिकेचा लोकार्पण कार्यक्रम नुकताच पुण्यातील वाकड येथील कस्पटे वस्ती भागातील सोनीगरा केसर सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये मोठया उत्साहात संपन्न झाला. मान्यवरांच्या लेखनासह आजी-माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक, शिक्षक यांच्या लेखनाने समृद्ध असलेली ही स्मरणिका ग्रामीण शालेय स्मरणिकांच्या आजवरच्या इतिहासात वेगळी वाट शोधू पाहाते आहे.कार्यक्रमाला व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक आणि प्रकाशक विभाकर वाचासिद्ध, निर्मिते ‘विद्यार्थीप्रिय शिक्षक’ अरुण केशव माने, ‘तंत्रशिक्षक’ शशिकांत शंकर वहाळकर, स्मरणिकेचे संपादक धीरज मच्छिंद्रनाथ वाटेकर, ज्येष्ठ माजी विद्यार्थिनी सौ. दीपाताई पाटणकर उपस्थित होते. कार्यक्रमात प्रारंभी शशिकांत वहाळकर यांनी शाळेच्या १९७२ ते २०२२ या पन्नास वर्षांच्या कालखंडाचा आढावा घेतला. शाळेचे कालानुरुप बदललेलं रूप, सध्याच्या शैक्षणिक सुविधा, सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त झालेला संपर्क आदीची मांडणी केली. स्मृतिशलाका स्मरणिकेचे संपादक धीरज वाटेकर यांनी स्मरणिकेचे अंतरंग उलगडून सांगताना कोयना प्रकल्पाच्या आणि अलोरे वसाहतीच्या इतिहासावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. निवडक माजी विद्यार्थी व विद्यार्थिनीनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. ‘स्मरणिकेच्या निमित्ताने शाळाच आम्हाला भेटायला आली असं वाटतंय’ असं सांगताना या कार्यक्रमाचं महत्व अनन्यसाधारण असल्याचे अनेकांनी नमूद केले. समारोप प्रसंगी मुख्याध्यापक विभाकर वाचासिध्द यांनी शाळेचे कर्तृत्ववान माजी विद्यार्थी हीच शाळेची ठेव असल्याचे सांगितले. अलोरे ही ग्रामीण भागातील शाळा पन्नास वर्षाच्या टप्प्यावर असताना शाळा आणि समाज अशा गत आठवणी जपणारी एकमेव शाळा असल्याचे त्यांनी म्हटले.चिपळूण तालुक्यातील अलोरे गावची पन्नास वर्षांपूर्वीची एक ओळख ‘वाशिष्ठीनगर’ अशी ओळख होती. तिच्या दुर्मीळ नोंदीसह पंचक्रोशीतील विविधांगी ऐतिहासिक व दुर्मीळ माहितीचा भरगच्च दस्तऐवज असलेल्या आणि कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या १९१७ ते २०१२पर्यंतच्या सचित्र इतिहासाची मांडणी असलेली ही स्मरणिका आहे. जगभर पसरलेल्या माजी विद्यार्थ्यांना अलोरे शाळा आज सातत्याने आठवावी लागते आहे. कालौघात अशा शाळा दुर्मीळ झाल्या आहेत. म्हणून शाळेच्या अनुषंगाने होणाऱ्या या डॉक्युमेंटेशनला विशेष महत्व आहे. या ‘गुरुवर्य’ मा. ना. कुलकर्णी यांचे स्मरण, शाळेचे नूतन वास्तू उद्घाटन, शाळेचा रौप्य महोत्सव, शाळेची आठवणीतील गॅदरिंग, विविध कार्यक्रम-उपक्रम, पारितोषिक वितरण समारंभ, प्रशस्तिपत्रके, दहावीच्या विविध बॅच, शाळेची बदलती लेटरहेड्स, शाळेचे वाचनालय, वृत्तप्रसिद्धी, सुवर्णमहोत्सवी छायांकित दर्शन आदी ‘सचित्रस्मृति’रंजक ठेवा यात आहे. शाळेच्या पालक शिक्षक संघाच्या पहिल्या अध्यक्षांसह अभियंता मनोगते, पालक मनोगते, ग्रामस्थ मनोगते, मुख्याध्यापक मनोगते, आजी-माजी शिक्षक-कर्मचारी मनोगते, ५४ आजी विद्यार्थी-विद्यार्थीनी मनोगते व कविता, ४९ माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी मनोगते आणि अलोरे शाळेचा कोयना प्रकल्पीय पूर्वेतिहास कथन करणारी ‘एका शाळेची गोष्ट’ यात वाचायला मिळेल. स्मरणिकेच्या दस्तऐवजीकरणात अलोरे गावाचा १८७०चा नकाशा, ऐतिहासिक घराणे ‘चंद्रराव’ मोरे यांची कोकणातील एकमेव मंदिर’स्मृति’ सांभाळणाऱ्या अलोरे गावची पूर्वपीठिका, कोयना जलविद्युत प्रकल्पाचा मागील शंभर वर्षांचा सचित्र ‘शोधक’ आढावा, परशुराम सहकारी साखर कारख्यान्यासह मंदार एज्युकेशन संकुल ‘स्मृति’दर्शन, आठवणीतील अलोरे-कोळकेवाडी पंचक्रोशी, एस.टी. प्रवासाची तिकिटे-पासेस, नाट्यसंस्कृती, चलतचित्र विभागाचे डोअर पासेस, प्रकल्प रुग्णालयासह पोस्ट ऑफिसच्या नोंदी, गणेशोत्सवाच्या मागील पन्नास वर्षांच्या अनुषंगिक आठवणी, विविध दुकानदारांची दुर्मीळ बीले संग्रहित केली आहेत. कार्यक्रम संयोजन समितीच्या वतीने प्रसाद बुटाला ((बॅच १९९५) आणि अमित कुलकर्णी (बॅच १९९८) यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी योगेश पाटील (१९९५), उमेश चाळके (१९९८), मंदार बेलुर ( १९९८), प्रशांत आगाशे (१९९८), अमोल खेडेकर, सचिन झेंडे, प्रविण पवार (१९८७), अभिषेक पाटील (२०००), सचिन चौधरी (१९९८), मधुरा वाघ-चौधरी, उत्कर्षा पावसकर, अनुष्का सतिश पालांडे (१९९८), सुप्रिया पवन पाच्छापुरे (१९९८), योगिता सचिन ओझरडे, विशाल विवेक खिरे (१९९५), तुषार पाटणेकर, आभिजित विलास फाटक (१९९५), राहुल रमेश जुवेकर (१९९०), केदार अरुण जोशी आदी उपस्थित होते.www.konkantoday.com