
महिलांच्या शाश्वत विकासासाठी गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद
रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाला प्राप्त झालेल्या अर्थात पीएम-उषा – राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA) या योजने अंतर्गत महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षातर्फे १२ व १३ सप्टेंबर रोजी महिलांच्या शाश्वत विकासासाठी महिलांचे शिक्षण, समानता आणि सबलीकरण या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात येणार आहे. ही परिषद ऑनलाइन आणि ऑफलाइन (Hybrid mode) पद्धतीत विवा एक्झिक्युटिव्ह, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे होईल. यात ऑस्ट्रेलिया येथील लाॅरा विल्यम्स, युनायटेड किंगडममधील बिर्गिट जलाव तसेच अटलांटिक येथील स्नोहोमिशच्या महापौर लिंडा रेडमाॅन या व्यक्ती विषय तज्ञ असणार आहेत. लोकसभेच्या माजी सभापती श्रीमती सुमित्रा महाजन यांच्या उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
मानवी समाजाच्या इतिहासात स्त्री-पुरुष समानतेचा प्रश्न नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. प्राचीन काळात अनेक संस्कृतींमध्ये स्त्रियांना ज्ञान, स्वातंत्र्य आणि अधिकार यांचा काही अंशी लाभ मिळत असे, परंतु काळाच्या ओघात स्त्रियांवर सामाजिक बंधने, परंपरागत बंधने व आर्थिक मर्यादा लादल्या गेल्या. परिणामी स्त्रियांना शिक्षणापासून, निर्णयप्रक्रियेतून व सामाजिक नेतृत्वापासून दूर ठेवले गेले. मात्र आता शिक्षणाने स्त्रीशिक्षण, समानता आणि सबलीकरण यांबाबत महिलांमध्ये जागृती निर्माण झालीय असे दिसून येत आहे. अगदी आपल्याला प्रेरणादायी असणाऱ्या सावित्रीबाई फुले ज्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी समाज रोष पत्करला. कल्पना चावला, सुनीता विल्यम्स ज्यांनी विज्ञान आणि अंतराळ क्षेत्रातील योगदानामुळे महिलांना नवे स्वप्न बघायला प्रेरणा मिळाली. किरण बेदी ज्या देशातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी म्हणून त्यांनी प्रशासनात नवा आदर्श निर्माण केला. तसेच कित्येक स्थानिक उद्योजिका ज्यांनी ग्रामीण भागात महिला बचतगटांनी शेती-उद्योग उभे केले आणि आत्मनिर्भरता साधली. या सर्वच स्त्रिया आदर्शवत आहेत.
स्त्रीविषयक चळवळींचा परिपाक म्हणून शिक्षण, समानता आणि सक्षमीकरण यांबाबत स्त्री सजग आहे. स्त्रीला शिक्षण मिळाल्यास ती आत्मनिर्भर बनते. तिच्यात आत्मविश्वास वाढतो आणि ती स्वतःच्या हक्कांसाठी उभी राहू शकते. तिचा व्यक्तिगत विकास होतोच पण तिचा कौटुंबिक स्तर सुद्धा उंचावतो. शिक्षित महिलांमुळे समाजात विवेकशील विचारसरणी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढतो. तसेच महिलांना नोकरी, व्यवसाय व नेतृत्वाच्या संधी मिळाल्याने त्या आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊन कुटुंबाच्या उत्पन्नात हातभार लावतात – कुटुंबाचा आणि पर्यायाने समाजाचा स्तर उंचावतो.
भारतीय संविधानाने स्त्री-पुरुष समानतेचा अधिकार दिला असला तरी व्यवहारात अनेकदा महिलांना दुय्यम स्थान दिले जाते. समानता केवळ शिक्षणापुरती मर्यादित नाही, तर रोजगार, राजकारण, मालमत्ता हक्क, आरोग्यसेवा आणि कुटुंबीय निर्णयांमध्येही ती लागू आहे. शैक्षणिक समानता, रोजगारातील समानता, करिअरमध्ये प्रगतीची समान संधी, राजकीय समानता, कायदेशीर समानता या केवळ कायद्यात आहेत म्हणून नाही तर मानवता म्हणून अंगीकारण्यात येणे तितकेच गरजेचे आहे. तसेच सबलीकरण म्हणजे फक्त शिक्षण किंवा आर्थिक स्वातंत्र्य नव्हे, तर स्वतःचे निर्णय घेण्याची, समाजात आपली ओळख निर्माण करण्याची आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची ताकद. ज्यामध्ये शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक राजकीय, मानसिक सबलीकरण अपेक्षित आहे. ग्रामीण भागातील स्त्रिया पाणी, इंधन, शेती यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांना पर्यावरण संवर्धनाचे प्रशिक्षण दिल्यास शाश्वत संसाधन व्यवस्थापन शक्य होते.
महिला शिक्षण आणि सबलीकरणाच्या मार्गात अनेक अडथळे अजूनही आहेत पण या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकार, समाज आणि व्यक्ती या सर्वांची भूमिका महत्त्वाची आहे. जसे की, बेटी बचाओ-बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी योजना, महिला बचतगट, स्टार्ट-अप प्रोत्साहन पर शासकीय धोरणे, शैक्षणिक सुविधा, मोफत शिक्षण, शिष्यवृत्ती, मुलींसाठी वसतिगृहे. महिलांना ऑनलाइन शिक्षण, ई-कॉमर्स, डिजिटल पेमेंट यासाठी डिजिटल साक्षरता प्रशिक्षण दिले जाते. महिला शिक्षण, समानता आणि सबलीकरण या त्रिसूत्रीशिवाय शाश्वत विकास शक्य नाही.
समानतेसाठी पुरुषांचे सहकार्य महत्त्वाचे आहे हे विसरून चालणार नाही. पुरुषांची स्त्रीविषयक मानसिकता बदलणे हे केवळ स्त्रीच्याच नाही तर एकूण समाजाच्याच शाश्वत विकासासाठी गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन, “महिलांच्या शाश्वत विकासासाठी महिलांचे शिक्षण, समानता आणि सबलीकरण” याचा आढावा घेण्यासाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षातर्फे ही परिषद आयोजित केली आहे.




