शेवटच्या सव्वाचार मिनिटांत नेमके काय घडले, पोलीस तपासात उघड
अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी मुंबईतील दहिसरमध्ये हत्या झाली. अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नरोन्हा सोबत फेसबुक लाईव्ह करत होते. त्यानंतर अचनाक मॉरिस याने अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्या.यावेळी शेवटच्या सव्वाचार मिनिटांत नेमके काय घडले. पोलिसांच्या तपासातून हा सव्वा चार मिनिटांचा थरार समोर आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरु आहे.
फेसबुक लाइव्हदरम्यान अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नरोन्हा दोघेच कार्यालयात होते. त्यावेळी मॉरिस याने ट्रायपॉड लावला. त्यानंतर त्याने फेसबुक लाइव्ह सुरू केले. फेसबुक लाईव्ह सुरु असताना दोन ते तीनदा तो उठून कॅमेऱ्याच्या बाजूला गेला. लाईव्ह सुमारे चार मिनिटे सुरु होते. त्यानंतर मॉरिस याने बंदुकीने पाच गोळ्या घोसाळकर यांच्या दिशेने झाडल्या. यापैकी चार गोळ्या त्यांना लागल्या.
घटनास्थळी अचानक गोळ्यांच्या आवाज आला. यामुळे नागरिकांची पळापळ झाली. घोसाळकर खाली कोसळले. गोळीबारानंतर मॉरिस याने दरवाजाकडे धाव घेतली. बाहेरच्या सीसीटीव्हीमध्ये मॉरिस दोन ते तीन सेकंद घोसाळकर यांना पाहताना दिसत आहे. त्यानंतर त्याच बंदुकीने मॉरिस स्वतःवर गोळी झाडण्याचा प्रयत्न करतो. मात्र, बंदुकीतील गोळ्या संपल्याने तो पहिल्या मजल्यावर धावला. त्याठिकाणी पुन्हा बंदूक लोड केली. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. सव्वाचार मिनिटांचा हा थरार पोलिसांच्या तपासातून समोर आला आहे.अभिषेक आणि त्यांची पत्नी तेजस्वी यांना एक मुलगी व मुलगा आहे. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस १४ फेब्रुवारी रोजी होता. लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते मुलांना फिरायला घेऊन जात होते. यावर्षी त्यांनी सेलिब्रेशनची तयारी केली होती. परंतु आता हे सेलिब्रेशन अपूर्ण राहिले. अभिषेक यांच्या हत्येमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांचे वडीलही निशब्द झाले आहेत.
www.konkantoday.com