भाजप कार्यकर्त्यांकडून पत्रकार निखिल वागळेंच्या गाडीवर हल्ला, अजित पवारांनी दिले कारवाईचे आदेश
पुणे – पुणे शहरातील दांडेकर पुलाजवळील राष्ट्र सेवा दल येथे विविध संघटनांमार्फत ‘लढा लोकशाहीचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा’ या विषयावर कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात पत्रकार निखिल वागळे, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, असीम सरोदे यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
या कार्यक्रमाला भाजपचा विरोध होता. निखिल वागळे यांचा कार्यक्रम पुण्यात होऊ नये म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांना निवेदन दिले होते. मात्र कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत वागळे ठाम होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पत्रकार निखिल वागळे येत होते. यावेळी त्यांच्या गाडीवर आक्रमक भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या घटनेत गाडीची तोडफोड करण्यात आली असून गाडीवर शाईफेकही केली. दांडेकर पूल चौकामध्ये देखील निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला.
दरम्यान, निखिल वागळेंच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. अशाप्रकारे कोणताही प्रकार सहन करता येणार नाही असे अजित पवार म्हणाले. निखिल वागळे यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण आडवाणी यांच्याबद्दल ट्वीट केले होते. त्यावरुन भाजपकार्यकर्ते आक्रमक झाले आहे.
निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला झाला त्यावेळी पुण्यात शास्त्री रोडवर मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. महाविकास आघाडी आणि महायुतीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. यावेळी महाविकास आघाडी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी काही महिला जखमी झाल्या आहेत. त्यांच्या अंगावर देखील शाईफेक करण्यात आली. याघटनेवर आता पुढे पोलिस काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे आहे.
www.konkantoday.com