*महाराष्ट्रातील एलईडी नौकांवर कारवाईत गुजरातमध्ये राष्ट्रीय हद्दीचा पेच*
_गुजरातसमोरील खोल समुद्रात बेकायदेशीररित्या एलईडी मासेमारी करताना भारतीय तटरक्षक दलाने पकडलेल्या महाराष्ट्रातील त्या सहा नौकांवर कायदेशीर कारवाई करण्यात गुजरात मत्स्य विभागापुढे सागरी हद्दीचा पेच निर्माण झाला आहे. या नौकांना बारा सागरी मैलापलिकडे मासेमारी केल्याने त्यांच्यावर गुजरात मत्स्य विभाग कारवाई करू शकलेला नाही. त्यामुळे या नौका अद्याप तटरक्षक दलाच्या ताब्यात असल्याची माहिती मत्स्य विभागाच्या सूत्रांनी दिली.२ फेब्रुवारी रोजी गुजरातमधील वेरावळ तटरक्षक दलाने महाराष्ट्रातील ३ मोठ्या व ३ लहान अशा एकूण ६ नौकांना पकडून त्यांना वेरावळ बंदरात आणले होते. या सर्व नौका मुंबई शहर विभागातील आहेत. या नौकांद्वारे १५ ते २० सागरी मैल अंतरावर अनधिकृत एलईडी असल्याचे छायाचित्र व चित्रफितीचा पुरावा तटरक्षक दलाने सादर केला आहे. या सहा नौकांवर एकूण ५३ मच्छिमार कार्यरत होते. दरम्यान या नौकांवर महाराष्ट्र राज्याच्या मासेमारी अधिनियमानुसार कारवाई केली जावी, यासाठी वेरावळ सहाय्यक मत्स्य आयुक्तांनी महाराष्ट्र मत्स्य विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. त्यानुसार ६ नौकांची नोंदणी व मासेमारी परवाना रद्द करण्याचे आदेश मुंबई शहर सहाय्यक आयुक्तांना वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले आहेत. www.konkantoday.com