मोठी बातमी! पक्ष आणि चिन्ह अजित पवारांचंच; निवडणूक आयोगाचा निर्णय
राष्ट्रवादी काँग्रेसमधील वर्चस्वाच्या लढाईत अखेर निवडणूक आयोगाने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूने कौल दिला. अजित पवार यांचा गट हाच खरा ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ असल्याचे सांगत आयोगाने ‘घड्याळ’ हे पक्ष चिन्ह देखील त्यांना बहाल केले आहे.आयोगाच्या या निवाड्याचे अजित पवार यांच्या गटाने स्वागत करत राज्यभर जल्लोष केला असून शरद पवार गटाने मात्र हा लोकशाहीचा खून असल्याची घणाघाती टीका केली.
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला आता स्वतःसाठी पक्षाचे वेगळे नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाला सुचवावे लागेल. आयोगाच्या या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी शरद पवार गटाने चालविली आहे.
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवडही आयोगाने रद्दहबातल ठरविताना यापुढे त्यांना कोणतेही निर्णय घेता येणार नसल्याचे म्हटले आहे. गेल्या वर्षी २ जुलैला अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्यासह ९ जणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेत थेट मंत्रिपदाचीच शपथ घेतल्याने राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला होता.
यामुळे शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच थेट दोन उभे गट पडले होते. हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला होता. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांची बाजू ऐकल्यानंतर आज १४१ पानांचा निर्णय जाहीर केला
www.konkantoday.com