बारावीची उद्यापासून प्रात्यक्षिक परीक्षा! बोर्डाकडून ८ पथके*;
बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असून २ फेब्रुवारीपासून बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होणार आहेत. त्यासाठी बोर्डाच्या आदेशानुसार प्रात्यक्षिक परीक्षांवर देखील भरारी पथकांचा वॉच राहणार आहे.दरम्यान, पेपर सुरू झाल्यावर अनेक महाविद्यालये, शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे सांगितली जातात. त्यावरही भरारी पथकांचे विशेष लक्ष असणार आहे.दहावी- बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात, यासाठी पुणे बोर्डाने ठोस नियोजन केले आहे. प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेवर आता बोर्डाचे विशेष लक्ष राहणार आहे. यंदा सरमिसळ पद्धतीने विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्रांवर क्रमांक असतील. एकाच शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी वेगवेगळ्या केंद्रांवर परीक्षा देतील असे नियोजन आहे.विद्यार्थ्यांना पेपर सुरू झाल्यावरच उत्तरपत्रिका दिली जाणार असून शेवटी दहा मिनिटांचा ज्यादा वेळ दिला जाणार आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा बोर्डाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी विशेष नियोजन केले आहे. प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा पारदर्शकपणे व्हावी, यासाठी भरारी पथके नेमली आहेत. सोलापूर जिल्ह्यासाठी स्थानिक चार आणि बोर्डाची चार पथके या परीक्षेवर लक्ष ठेवून असणार आहेत. परीक्षेवेळी प्रत्येक केंद्रावर बैठे पथक असणार असून प्रश्नपत्रिकांचे सील फोडतानाचे फोटो काढून ठेवावे लागणार आहेत. परीक्षा सुरू झाल्यानंतर एखादा विद्यार्थी परीक्षेसाठी आल्यास त्याला परीक्षेला बसता येणार नाही, असा देखील नियम करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठी अर्धा तास अगोदर केंद्रावर उपस्थित राहावे लागणार आहे.www.konkantoday.com