मागण्यांची पूर्तता करा, अन्यथा बारावी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासंदर्भात महासंघाशी त्वरित चर्चा करावी, समस्यांचे निराकरण करावे; अन्यथा बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी कामावर बहिष्कार आंदोलन सुरू करावे लागेल.त्यामुळे होणार्या नुकसानीस शासन जबाबदार असेल, असा इशारा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन पाठवले आहे.
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्यांबाबत चर्चा करून 2 मार्च, 2023 रोजी काही मागण्या मान्य करत लेखी आश्वासन दिल्यानंतर महासंघाने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे घेतला होता. त्यानंतर मान्य मागण्यांमधील 1298 वाढीव पदांना मान्यता देण्याऐवजी या पदांवर कार्यरत केवळ 283 शिक्षकांच्या समावेशनाचा आदेश काढला. राज्यात काही शिक्षकांचे समावेशन करण्यात आले; परंतु अनेक शिक्षकांचे समावेशन अजून झालेले नाही. अनेक शिक्षकांबाबत त्रुटीची पूर्तता होऊनही त्यांच्या समावेशनाचे आदेश निघालेले नाहीत, तसेच यापैकी एकाही शिक्षकाचे वेतन सुरू झालेले नाही.
www.konkantoday.com