
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा नागरी संरक्षण विभाग आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा महाविद्यालयात नुकतीच झाली. आपत्तीपूर्व व्यवस्थापन कसे करावे, तसेच आपत्तीनंतरचे व्यवस्थापन आणि उपाययोजना, आपत्ती उद्भऊ नये म्हणून घेण्याची खबरदारी या विषयीची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, या हेतूने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कला शाखा उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांच्या हस्ते झाले. या कार्यशाळेसाठी साधनव्यक्ती म्हणून रत्नागिरी जिल्हा नागरी संरक्षण विभागाचे सहाय्यक उप-नियंत्रक सु. सी. मदगे आणि एम. के. म्हात्रे यांनी काम पाहिले. सु. सी. मदगे यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती, त्याचे प्रकार इ. विषयक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच नागरी संरक्षण विभाग पुरवीत असलेल्या सेवांवर प्रकाश टाकला.