राज्यपालांनी शालेय विद्यार्थ्यांसोबत ‘परीक्षा पे चर्चा’ ऐकली**विद्यार्थ्यांचा गृहपाठ कमी करून तासिकांमधील अवकाश वाढवावा : राज्यपालांची सूचना*_______________
राज्यपाल रमेश बैस आज विविध शाळांमधील शिक्षक, पालक व शालेय विद्यार्थ्यांसह राजभवन येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम ऐकला तसेच विद्यार्थी, शिक्षक व पालकांशी संवाद साधला. शिक्षण हा विद्यार्थ्यांकरिता सुखद व आनंददायी अनुभव असावा. या दृष्टीने शिक्षण कार्यात शिक्षकांसह पालकांचा देखील सहभाग असला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. अनेक देशांमध्ये आज विद्यार्थ्यांना गृहपाठ न देता शाळेतच अभ्यास करुन घेतला जातो. शिक्षण प्रात्यक्षिक व कृती – आधारित असते. त्यामुळे विचारशक्तीला चालना मिळते. फिनलंड देशांत प्रत्येक ४५ मिनिटांच्या तासिकेनंतर मुलांना १५ मिनिटांचा अवकाश दिला जातो. चार भिंतींच्या आत जितके शिक्षण होते, तितकेच ते वर्गाच्या बाहेर होते, असे सांगून तासिकांमधील अवकाश हा वेळेचा अपव्यय समजला जाऊ नये. शिक्षण प्रक्रियेत उपरोक्त बदल स्वीकारण्याबद्दल विचार व्हावा, असे राज्यपालांनी सांगितले. ग्रामीण भागातील व शहरी भागांमधील शाळांमध्ये मोठी असमानता दिसून येते. विद्यार्थी कोठेही असला तरीही त्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे. आज भारताकडे तंत्रज्ञान आहे. त्याचा वापर करून ऑनलाईन व प्रत्यक्ष वर्गातील शिक्षण यांचा सुवर्णमध्य साधून मुलांना सर्वोत्तम शिक्षण दिले गेले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. जपान मधील शाळा अतिशय स्वच्छ असतात. स्वच्छतेच्या संस्कारामधून विद्यार्थी जबाबदार नागरिक घडतात व पुढे देश स्वच्छ ठेवतात. शाळा स्वच्छ व सुंदर राहतील, तसेच विद्यार्थ्यांकरिता पुरेशी स्वच्छतागृहे असतील या दृष्टीने विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जी डी सोमाणी, गोपी बिर्ला मेमोरियल स्कुल व अंजुमन इ इस्लामच्या सैफ तैयबजी गर्ल्स हाय स्कुलचे विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाला शालेय शिक्षण विभाग व बृहन्मुंबई महानगर पालिका यांचे सहकार्य लाभले. www.konkantoday.com