बा. ना. सावंत रोड नवीन भाजी मार्केट इमारतीचे भूमिपूजन.

समाज माध्यमांचा वापर विकास कामांसाठी करा भाजी मार्केटसाठी निधीची कमतरता पडणार नाही – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी, दि.18 : आपल्या शहरात झालेली विकासकामे प्रत्यक्ष भेट देऊन पहावीत. ती इतरांना सांगण्यासाठी आणि पर्यटन वाढीसाठी समाज माध्यमांचा वापर करावा. कोकणचा विकास हे ब्रीद घेऊन काम करीत आहे, त्यामुळे या भाजी मार्केटसाठी निधीची कमतरता पडणार नाही, असे आश्वासन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.

वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत रत्नागिरी नगरपरिषद हद्दीमधील बा. ना. सावंत येथील नवीन भाजी मार्केट इमारतीचे भूमिपूजन कोनशिला अनावरण करुन आज झाले. पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, आपल्या शहरात झालेली विकास कामे पहायला उपमुख्यमंत्री अजितदादा आले. ही झालेल्या कामांची पोच पावती आहे. राज्यात तळोजानंतर दुसरी स्मार्ट सिटी रत्नागिरी होत आहे. त्यासाठी साडेचारशे कोटी रुपये दिले आहेत. जुने जसे होते तसेच नव्या मार्केटमध्ये व्यापाऱ्यांना ठेवले जाईल. ही इमारत पूर्ण होऊ दे, अजून गरज लागली तर आणखी निधी दिला जाईल. सुखकर भाजी मार्केटसाठी निधीची कमतरता पडणार नाही. ही इमारत बांधून झाल्यावर ती स्वच्छ ठेवणे हे आपले काम आहे.

आधुनिक यंत्रणा वापरुन शहर स्वच्छ ठेवले पाहिजे. घनकचऱ्यासाठी 5 एकर जागा नगरपरिषदेकडे सूपुर्त झाली आहे. साडे आठ कोटी निधी देखील दिला आहे. वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण होईल. असे सांगून पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, पर्यटकांची संख्या वाढत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी संग्रहालय होत आहे. आरे वारे जंगलात ॲडव्हेंचर पार्क होणार आहे. वर्षभरानंतर रत्नागिरीतून विमानाचे उड्डान होईल. विमानतळाचे 75 टक्के काम पूर्ण झाले आहे. संसारे उद्यानात अध्यात्मक केंद्र होत आहे. बौध्दविहार होत आहे. व्हीआयटी सेमीकंडक्टर हा २० हजार कोटींचा कारखाना सुरु होत आहे. त्यामधून रोजगार निर्माण होणार आहे.

देशातला पहिला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मसमर्पण दिन रत्नागिरीत झाला. छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा रत्नागिरीत उभा केला. त्यानंतर दीड वर्षांनी छावा हा चित्रपट आला. वाटद येथे धीरुभाई अंबानी डिफेन्स क्ल्स्टरमधून स्वबनावटीच्या बंदुका निर्माण होणार आहे. कोकणचा विकास हे ब्रीद घेऊन काम करतोय. ही विकास कामे सांगण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर करावा, असे सांगून अंमली पदार्थ मुक्त मोहिमेत सर्वांनी सामील व्हावे. समजलेली माहिती पोलीसांना सांगावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सामंत यांनी केले. तळमजल्यावर 17 गाळे, भाज्यांची 38 दुकाने, स्वच्छतागृह, पहिल्या मजल्यावर 9 कार्यालय, बहुउद्देशीय सभागृह, स्वच्छतागृह, विद्युत व्यवस्था, डेनेज सिस्टीम आदी सुविधांसह 2 कोटी निधीमधून ही इमारत पूर्ण होणार आहे.

माजी नगरसेवक राजेश तोडणकर यांनी प्रास्ताविक केले. भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्नाशेठ सुर्वे, बंड्या साळवी, स्मितल पावसकर, राहूल पंडित, बिपीन बंदरकर, राजन फाळके, बाबूशेठ भाटकर, ॲड बाबासाहेब परुळेकर, प्रमोद रेडीज, अजय गांधी, पल्लवी पाटील आदींसह नागरिक उपस्थित होते.000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button