
दहावी-बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आता परीक्षेसाठी दहा मिनिटे जादाचा वेळ मिळणार
दहावी-बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आता परीक्षेसाठी दहा मिनिटे जादाचा वेळ मिळणार आहे.विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंडळाच्या या निर्णयामुळे सध्या दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
राज्य मंडळातर्फे दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी परीक्षेच्या वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिकांचे वाटप विद्यार्थ्यांना यापूर्वी करण्यात येत होते. दरम्यान, दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालकांसह आणि समाज घटकांचेही या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते. परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा, यांसारख्या घटना काही अंशी घडत असल्याचे निदर्शनास आले. अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि परीक्षा निकोप, भयमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात, यासाठी परीक्षेच्या दिलेल्या वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या परीक्षेपासून रद्द करण्यात आली होती. परंतु विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आणि पालक-विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या परीक्षांसाठी दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. परीक्षेच्या वेळेनंतरची दहा मिनिटे वाढवून दिली आहेत, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.
www.konkantoday.com