प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी सजली ‘अयोध्या नगरी’; आज प्राणप्रतिष्ठा
गेल्या कित्येक शतकांपासून भारतवर्षाला ज्या क्षणाची प्रतीक्षा होती, तो क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. अयोध्येत आज भक्तिपूर्ण वातावरणात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे.न भूतो न भविष्यती अशा या सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी भारतासह जगभरातील रामभक्तांचे डोळे लागले आहेत. संपूर्ण देशात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असताना प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी राम मंदिर फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 7 हजार 140 विशेष निमंत्रकांच्या उपस्थितीत राम मंदिरातील गर्भगृहात पांरपरिक पद्धतीने पूजापाठ आणि मंत्रोच्चारात रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या भव्य सोहळ्यात 112 परदेशी पाहुणेही सहभागी होणार आहेत. रामनगरी अयोध्येत 150 चार्टर्ड विमान उतरणार आहेत. व्हिव्हीआयपी घडामोडींमुळे अयोध्या नगरीला छावणीचे रूप आले आहे. जागोजागी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अयोध्येत 25 हजारांहून अधिक जवान तैनात आहेत. एसपीजी, सीआयएसएफ, स्पेशल कमांडो, सीआरपीएफ, एनएसजी आणि एटीएस कमांडो येथे तैनात आहेत. एवढेच नाही तर गुप्तचर यंत्रणा सक्रिय आहे. अयोध्या नगरीची सीमा बंद करण्यात आली असून निमंत्रणाशिवाय आत कुणालाही प्रवेश नाही. ड्रोनच्या माध्यमातून सर्व घडामोडींवर नजर ठेवली जात आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर अयोध्येत खास दीपोत्सवही यला मिळणार आहे. प्रभू श्रीरामांची नगरी अयोध्या लक्ष-लक्ष दिव्यांनी उजळून निघणार आहेअयोध्या नगरीतील विविध मंदिरांमध्ये कीर्तन, भजन अशा कार्यक्रमांबरोबरच रामायण तसेच रामचरित मानसचे अखंड पठण, भंडारे असे कार्यक्रम सुरू होते. मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यापूर्वी रविवारी रात्री विविध पवित्र नद्यांच्या पाण्याने स्नान घालण्यात आले. याशिवाय शय्याअधिवास, होम, रात्रीजागरण हे विधी होऊन प्राणप्रतिष्ठेपूर्वीच्या विधींची सांगता करण्यात आली.
सकाळी 10 वाजता होणार विधीला सुरुला
आज सकाळी 10 वाजेपासून ‘मंगल ध्वनी’च्या वादनाने विधीला सुरूवात होईल. विविध राज्यांतील 50 हून अधिक मनमोहक वाद्ये सुमारे 2 तास या शुभ सोहळ्याचे साक्षीदार बनतील. दुपारी 12.20 वाजता रामलल्लाच्या अभिषेक विधीला सुरुवात होईल, तर दुपारी 1 वाजता प्राणप्रतिष्ठा विधी संपन्न होईल, अशी माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने दिली आहे.
10 लाख दिव्यांनी उजळणार अयोध्या
अभिषेक सोहळ्यानंतर संध्याकाळी अयोध्या नगरी दिव्यांनी सजवली जाईल. यावेळी अयोध्येत 10 लाख दिवे लावण्यात येतील. याशिवाय अयोध्येतील घर, दुकाने, आस्थापना आणि पौराणिक स्थळांवर ‘रामज्योती’ प्रज्वलित करण्यात येणार आहे.
पाहुण्यांना मिळणार खास प्रसाद
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने पाहुण्यांना देण्यासाठी प्रसादाची 15 हजार पाकिटे तयार केली आहेत. या प्रसादाच्या पाकिटात गुळासोबत रेवडी, रामदाणे चिक्की, अक्षता, दिवा आणि रोळीदेखील प्रसाद म्हणून मिळणार आहे. हा प्रसादाचा बॉक्स खास पद्धतीने पॅक करण्यात आला आहे आणि प्रसादाच्या पाकिटात विशेषत: विष्णूला प्रिय असलेली तुळशीची डाळदेखील देण्यात आली आहे.
www.konkantoday.com