
कामथे धरणात सांडपाणी सोडल्याप्रकरणी ठाकरे शिवसेना कार्यकर्त्यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर धडक,
कामथे येथील धरणात टँकरमधून नेण्यात येणारे कंपनीचे सांडपाणी सोडल्याचा प्रकार स्थानिक ग्रामस्थांनी उघडकीस आणला. यामुळे कामथे, कापसाळ परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्यकर्त्यांनी येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर धडक दिली व संबंधित कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली.येत्या तीन दिवसांत कारवाई झाली नाही, तर ग्रामस्थांना घेऊन आंदोलन छेडू, असा इशारा उबाठा युवा सेनेचे तालुका अधिकारी उमेश खताते यांनी दिला.
दोन दिवसांपूर्वी कामथे येथील धरणात रात्रीच्यावेळी टँकरचे पाईप सोडून गाणे-खडपोलीमधील एका कंपनीचे सांडपाणी सोडण्यात येत होते. हा प्रकार ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच तत्काळ त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व हा प्रकार उघडकीस आणला. यावेळी टँकरचालक घटनास्थळावरून पसार झाले. यानंतर चिपळूण पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई सुरू केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांनी देखील याची दखल घेतली असून, घटनास्थळी जाऊन धरण परिसरातील विहिरी आणि पाईपमधून सोडण्यात आलेल्या सांडपाण्याचे नमुने घेतले आहेत.