मार्लेश्वर-गिरिजादेवीचा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या स्वयंभू श्री देव चि. मार्लेश्वर आणि साखरप्याची चि. सौ. का. गिरिजादेवी यांचा विवाहसोहळा (कल्याणविधी) सोमवारी (दि.१५) दुपारी १ वाजण्याच्या मुहुर्तावर थाटामाटात संपन्न झाला. यावेळी सनई-चौघड्यांचे मंजुळ सूर मार्लेश्वर तीर्थक्षेत्री घुमले. तर विवाहसोहळा संपन्न होताच उपस्थित हजारो भाविकांनी शिवहरा.. हर हर मार्लेश्वर.. हर हर महादेवचा जयघोष करत सह्याद्रीच्या पर्वतरांगा दणाणून सोडल्या.
संंगमेश्वर तालुक्यातील मारळ येथील सह्याद्रीच्या कडेकपारीत निसर्गरम्य ठिकाणी एका गुहेमध्ये स्वयंभू श्री देव मार्लेश्वर देवस्थान वसले आहे. मार्लेश्वराचा वार्षिक यात्रोत्सव यावर्षी दि. १२ ते १८ जानेवारी या कालावधीत साजरा होत आहे. मकरसंक्रांतीदिनी सोमवारी चि. मार्लेश्वर व चि. सौ. का. गिरिजादेवी यांचा कल्याणविधी सोहळा (विवाह) मार्लेश्वर तीर्थक्षेत्री (शिखर) हजारो भाविकांच्या साक्षीने हिंदू लिंगायत धर्मिय शास्त्रानुसार सोमवारी दुपारी थाटामाटात पार पडला.
www.konkantoday.com