
महायुती सरकारचे कार्यकर्ते एकत्रित येऊन रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्य घेऊन उमेदवार लोकसभेत पाठवणार-आमदार नितेश राणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुती सरकारचे कार्यकर्ते एकत्रित येऊन रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्य घेऊन उमेदवार लोकसभेत पाठवणार आहेत.यासाठी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची मने जुळवून एकत्रित लढा देण्याचे निश्चित केले आहे. म्हणूनच येत्या १४ ला कणकवलीत भगवती मंगल कार्यालयात महायुतीचा पहिला संयुक्त मेळावा आयोजित केला असल्याची माहिती महायुतीचे समन्वयक आमदार नितेश राणे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेतून दिली.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वातावरण तापू लागले असून राज्यात सत्तेत असलेले शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी एकत्रित येऊन लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे निश्चित केले आहे. याबाबत माहिती देण्यासाठी येथे आयोजित पत्रकार परिषदेला प्रभाकर सावंत, संजय आंग्रे, अबिद नाईक, काका कुडाळकर, अशोक दळवी आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार राणे म्हणाले, ”लोकसभा निवडणूक महायुती म्हणून लढविणार आहोत. तीन पक्षाच्या प्रमुखांनी तो निर्णय जाहीर केला आहे. तीन पक्षाच्या संयोजकपदी आपली निवड केली आहे. कणकवलीच्या भगवती मंगल कार्यालयात होणाऱ्या या संयुक्त मेळाव्याला भाजपचे वरिष्ठ नेते प्रसाद लाड यांच्यासह सर्व पक्षाचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.”
www.konkantoday.com