रेशन धान्य दुकानदारांचा संप स्थगित
राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ यांनी केलेल्या मागण्यांमधील बहुतांश मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे.याबद्दलचे ठोस आश्वासन मिळाल्याने आणि दिल्ली येथील मोर्चासाठी तूर्तास मैदान उपलब्ध होत नसल्याने महासंघाने संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शुक्रवार (ता. १२) पासून जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकाने पूर्ववत सुरू होतील. तसेच धान्याचे वितरणही केले जाईल, अशी माहिती महासंघाच्या वतीने देण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी प्रसिद्ध केले आहे.
निवेदनात म्हटले आहे, अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावले होते. यावेळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी रेशन धान्य दुकानदारांच्या १६ मागण्यांचे निवेदन दिले. यावर चर्चा करताना सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे नवे धोरण लवकर जाहीर करण्यात येईल. मार्जिन रक्कम दुकानदारांना महिन्याच्या पाच तारखेला देण्यात येईल. कमिशन वाढीचा प्रस्ताव वित्तीय विभागाकडे पाठवण्यात आला असून याबाबतचा निर्णय लवकर कळवण्यात येईल. ही आश्वासने दिल्यामुळे महासंघाने संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील ५३ हजार रेशन दुकाने शुक्रवार (ता.१२) पासून सुरू होतील. त्यामुळे डिसेंबर व जानेवारीचे धान्य वितरण पूर्ण केले जाईल.
www.konkantoday.com