फूड सिक्युरिटी आर्मीसाठी प्रशिक्षण सुरु करावे– शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर


   *रत्नागिरी, दि.९   शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कोकण कृषी विद्यपीठ आणि कृषी विभागाने केरळच्या धर्तीवर फूड सिक्युरिटी आर्मी तयार करण्यासाठी युवकांना प्रशिक्षण देण्यास सुरु करावे, अशी सूचना शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग मंत्री तथा सिंधुरत्न कार्यकारी समितीचे अध्यक्ष दीपक केसरकर यांनी केली.
        येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सिंधुरत्न समृध्द योजना आढावा बैठक काल घेतली. जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे, संचालक विस्तार शिक्षण प्रमोद सावंत, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे आदी उपस्थित होते. सिंधुदूर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे, पर्यटन उपसंचालक हणमंत हेडे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.  
        शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यावेळी म्हणाले, शेतमजूर नसल्याने सध्या शेती खालील जमीन कमी होत आहे. त्याचबरोबर शेत मजूर म्हणून काम करताना कमीपणा वाटू नये म्हणून त्यांना मिलिटरी सारखे प्रशिक्षण द्यायचे. ५०- ५० ची तुकडी करुन कृषी महाविद्यालय ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी हे प्रशिक्षण मिशन मोडमध्ये सुरु करावेत. प्रशिक्षणानंतर त्यांना अवजारांची बँक देणार आहोत. त्यासाठी प्रशिक्षीत युवकांना  शेतकऱ्यांशी समन्वय करुन द्यावा. ७५ टक्के सबसिडी उर्वरित २५ टक्के बँकेचे कर्ज त्यांनी भरले पाहिजे. याचे प्रमुख कुलगुरु असतील, आपण सर्वजण मिळून सहकार्य करु.
        एसआरआय पध्दतीने भात लागवड, दुहेरी पीक पध्दती, आंब्यामध्ये आंतरपीक म्हणून हळद घेऊ शकतो का. याबाबत कृषी विभागाने आणि विद्यापीठाने शेतकऱ्यांना मार्गदर्शित करुन प्रोत्साहीत करावे. ॲग्रो टुरिझम सुरु करण्याबाबतही पुढाकार घ्यावा. नॅचरोपॅथी, आयुर्वेदिक हेल्थ स्पा, गोव्याच्या धर्तीवर स्पाईस व्हिलेज सिंधुदूर्ग जिल्ह्याने सुरु करावेत. पर्यटन विभागाने १५ दिवसात कृषी पर्यटन सुरु करावे. मत्स्यव्यवसाय विभागाने शीतपेटीसह ई स्कुटर योजना यशस्वी करावी, असेही ते म्हणाले. यावेळी महिला व अर्थिक विकास महामंडळाच्यावतीने करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशनही करण्यात आले.

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button