जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या हस्ते ‘लोटिस्मा’त अपरान्त’पुत्रांच्या तैलचित्रांचे अनावरण


चिपळूण : लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे काम कौतुकास्पद आहे. अखिल जगाचा व्यापक विचार करून रत्नागिरी जिल्हयात १८५४ साली पहिले वर्तमानपत्र ‘जगन्मित्र’ सुरु करणारे पत्रकार कै. जनार्दन हरि आठल्ये, हिंदी वृत्तपत्रसृष्टीचे भिष्म पितामह कै. बाबुरावजी रामचंद्र पराडकर, तळहाती शिर घेऊन स्वातंत्र्यसमरात देहाची समिधा अर्पण करणारे क्रांतिकारक कै. गणेश गोपाळ आठल्ये या तीन महनीय ‘अपरान्त’पुत्रांच्या तैलचित्राचे अनावरण झाले आहे. वाचनालयाला सर्वोतोपरी सहकार्य राहील अशी भावना व्यक्त करून कोकणातील लोकसंस्कृती जपण्याचे काम ‘लोटिस्मा’आपुलकीने करत असल्याचे मत जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरच्यावतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने अनोखा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते कै. जनार्दन हरी आठल्ये, कै. बाबूरावजी रामचंद्र पराडकर आणि कै. गणेश गोपाळ आठल्ये या तिघांच्या तैलचित्राचे अनावरण पत्रकारदिनी करण्यात आले. ‘लोटिस्मा’च्या आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर सभागृहात, त्यांच्याच पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, वाचनालयाचे उपाध्यक्ष सुनील खेडेकर, पोलिस निरीक्षक, अपरांतपुत्रांच्या मूळ छायाचित्रांची उपलब्ध करून देणारे यशवंतराव आठल्ये, क्रांतिकारक आठल्ये यांचे नातू सुरेश आठल्ये, वाचनालयाचे कार्यवाह विनायक ओक होते.

आजची पिढी रिल्स कडे वळली आहे. वाचनसंस्कृती मागे पडते आहे. त्यामुळे वाचनालयाचे काम अविरत पुढे चालायला हवे आहे. पत्रकारदिनी एक चांगला योग जुळून आला आहे. आपल्या हस्ते तीन महनीय व्यक्तींच्या तैलचित्रांचे अनावरण होत आहे. त्याचा मनस्वी आनंद होत आहे. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर वेगवेगळे उपक्रम घेऊन समाजासाठी काम करीत आहे. त्यामुळे या संस्थेला आपण कायम सहकार्य करू. त्यांचे यापुढील जे कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमांना आपले पूर्ण सहकार्य राहील. आज वाचनाची खरी गरज आहे. लोकांनी वाचले पाहिजे. वाचनालय चालविताना देखील त्या व्यवस्थापनाने अलिकडच्या अत्याधुनिक युगाचा अवलंब केला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. समाज माध्यमांवर अतिशयोक्ती निर्माण करणारा मजकूर प्रसूत होत असताना जागरूकतेने काम करावे लागणार असल्याचे कुलकर्णी म्हणाले. यावेळी सुनील खेडेकर व विनायक ओक यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

रत्नागिरी जिल्हयात १८५४ साली पहिले वर्तमानपत्र ‘जगन्मित्र’ सुरु करणारे पत्रकार कै. जनार्दन हरि आठल्ये
हिंदी वृत्तपत्रसृष्टीचे भिष्म पितामह कै. बाबुरावजी रामचंद्र पराडकर यांच्या जीवनकार्याचे निवेदन धीरज वाटेकर यांनी केले. तर तळहाती शिर घेऊन स्वातंत्र्यसमरात देहाची समिधा अर्पण करणारे क्रांतिकारक कै. गणेश गोपाळ आठल्ये यांच्या जीवनकार्याचे विवेचन कीर्तनकार शैलेश आठल्ये यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन वाचनालयाचे संचालक धीरज वाटेकर यांनी केले तर आभार कार्यवाह विनायक ओक यांनी मानले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button