
असोंड कुंभारवाडीचा रस्ता गेला वाहून
दापोली तालुक्यातील मुख्य रस्त्यावर असणार्या असोंड गावातील एसटी स्टँडवरून कुंभारवाडीकडे जाणारा रस्ता व मोरी रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे वाहून गेली. यामुळे वाडीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
गेले २ दिवस मुसळधार पावसामुळे रस्त्याशेजारील ओढा भरून वाहू लागला. प्रचंड पाण्याचा वेग मोरीवरून गेल्याने अखेर मोरीसह रस्ता वाहून गेला. परिणामी गणेशवाडी तसेच अर्धी कुंभारवाडी या वस्त्यांचा गावाशी संपर्क तुटला असून याच मार्गाने नळपाणी योजनेकडे जाण्याची सोय असल्याने पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे. रस्त्यालगतची पिण्याच्या पाण्याची विहीरही आता नागरिकांसाठी दुर्गम झाली आहे. २ वर्षांपूर्वी याच रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. त्यावेळीच मोरीच्या ठिकाणी पुलाची मागणी ग्रामपंचायतीने केली होती. तसेच मार्च २०२३ पूर्वी जिल्हा परिषद विभागाकडेही लेखी पत्राद्वारे मागणी पोहोचवण्यात आली होती. मात्र अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याने ही आपत्ती ओढवल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या घटनेच्या ठिकाणी जाऊन ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच तसेच सदस्य व ग्रामस्थांनी पाहणी केली.www.konkantoday.com




