इव्हीएमवरून इंडिया आघाडीची निवडणूक आयोगाकडे धाव
आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेससह इंडिया आघाडीने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (इव्हीएम) चा मुद्दा तापवायला सुरुवात केली आहे. पुन्हा इव्हीएम मशीनसोबत वापरण्यात येणाऱ्या व्हीव्हीपॅट मशीनबद्दल काही सूचना देण्यासाठी विरोधकांच्या इंडिया आघाडीने मुख्य निवडणूक आयुक्तांना वेळ मागितला आहे. यापूर्वीही त्यांनी २० डिसेंबरला वेळ मागितला होता. मात्र त्यांना वेळ देण्यात आला नाही. काँग्रेसचे माध्यम सरचिटणीस जयराम रमेश यांनी पुन्हा एकदा मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून भेटीसाठी वेळ मागितला आहे.
१९ डिसेंबरला झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत एक ठराव संमत करण्यात आला होता, ज्यामध्ये आघाडीतील घटक पक्षांनी इव्हीएमसह व्हीव्हीपॅटसंदर्भात काही प्रश्नांसह तपशीलवार निवेदन सादर केले. मात्र निवडणूक आयोग भेटीसाठी टाळाटाळ करत आहे, अये या ठरावात म्हणण्यात आले होते. त्याच्या पुढच्या दिवशी (२० डिसेंबर) पुन्हा इंडिया आघाडीने पत्र लिहीले. मात्र तेव्हाही आयोगाकडून भेटीचा वेळ देण्यात आला नव्हता.
पुन्हा मंगळवारी (२ जानेवारी) जयराम रमेश यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहीले आहे. त्यांनी पत्रात लिहील्यानुसार, सर्वप्रथम ९ ऑगस्ट २०२३ ला इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या वतीने एक निवेदन मुख्य निवडणूक आयुक्तांना देण्यात आले होते. त्यापुढेही सलग ३ वेळा इंडिया आघाडीतील नेत्यांच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटण्यासाठी वेळ मागितला होता. मात्र तेव्हाही त्यांना वेळ देण्यात आला नाही. त्यानंतर २३ ऑगस्टला इंडिया आघाडीकडून निवेदनाद्वारे विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाच्या वतीने विविध दाखल्यांसह देण्यात आली. मात्र निवडणूक आयुक्तांकडे भेटीसाठी वारंवार वेळ मागूनसुद्धा वेळ देण्यात आला नाही.
www.konkantoday.com