महावितरणचा निष्काळजीपणा, राजापूर तालुक्यातील पाजवेवाडी सौंदळ येथे राहत्या घराच्या आवारात महिलेचा मृत्यू
जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पाजवेवाडी सौंदळ येथे राहत्या घराच्या आवारात आशा राजाराम पवार यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची विद्युत निरीक्षण विभाग, रत्नागिरीकडून संपूर्ण चौकशी करण्यात आली. यानुसार या घटनेत महावितरणला जबाबदार धरण्यात आले आहे आहेत.
उद्योग उर्जा व कामगार विभागाच्या विद्युत निरीक्षण विभाग रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार, सुरूवातीस या घटनेचा महावितरणकडून सदर अपघात सूचना, अहवाल, अपघातस्थळाचे प्रत्यक्ष केलेले निरीक्षण व तपासणी, नोंदवलेले जबाब याचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार ३३/११ केव्ही पाचल उपकेंद्रातून निघालेल्या ११ केव्ही सौंदळ फिडरद्वारा रोहित्र क्र. ४७६३५११ पाजवेवाडी या १०० केव्ही क्षमतेच्या रोहित्रास वीजपुरवठा केला जातो. या रोहित्रास २ आऊटगोईंग सर्किट आहे. त्यापैकी रोहित्रापासून सर्किट क्र. १ साठी फक्त वाय फेज व न्युट्रलसाठी प्रत्येकी १० स्क्वेअर एमएमची केबल जोडली आहे. ही केबल रोहित्र केंद्राच्या स्ट्रक्चर पोलवर न्यू क्लॅम्प लावून शॅकल इनस्युलेटरवरून १ फेज २ वायर लघुदाब उपरी तारमार्गासाठी जोडण्यात आली होती. या उपरी तारमार्गावर झाडांच्या फांद्या येत होत्या. २७ सप्टेंबर २०२२ रोजी जोराचा वारा व वादळामुळे झाडांची फांदी या लघुदाब उपरी तार मार्गाच्या फेज वाहकावर पडून फेज वाहक मध्यावर तुटून खाली असणार्या झुडुपावर लोंबकळत पडला होता. यावेळी आशा पवार यांच्या घराजवळून उपरी तारमार्ग वितरित होत असल्याने तुटलेल्या फेज वाहक त्यांच्या घरासमोरील आवारात पडला होता. २७ सप्टेंबर २०२२ रोजी पाजवेवाडी सौंदळ, ता. राजापूर येथे सकाळी ६.३० वा. घरासमोरच्या आवारात आशा पवार वावरत असतानाच तुटलेल्या व लोंबकळलेल्या अवस्थेत असणार्या विद्युतभारित वाहकाच्या संपर्कात त्या आल्या व यातच त्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.
www.konkantoday.com