
रत्नागिरी शहरातील जुने भाजी मार्केट आणि नवीन भाजी मार्केटची ओळख मिटणार
रत्नागिरी नगरपरिषद मालकीच्या दोन्ही भाजीमार्केटची ओळख संपुष्टात येणार आहे. बाजारपेठेतील जुने भाजी मार्केट आणि विठ्ठल मंदिरजवळील नवीन भाजीमार्केटच्या इमारती पाडण्यात आल्या आहेत. या ठिकाणी भाजी मार्केटच्या नवीन इमारती उभारल्या जाणार आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील जुने भाजी मार्केट आणि दुसर्या नवीन भाजी मार्केटची ओळख मिटणार आहे. एकाचवेळी दोन्ही इमारतींची कामे सुरु होत असून या दोन्ही नवीन इमारतींना नवीन नावे मिळणार आहेत.
रत्नागिरी शहराची बाजारपेठ असलेल्या ठिकाणी जे भाजीमार्केट आहे, त्या मार्केटला जुने भाजीमार्केट म्हणून ओळखले जाते. ही कौलारु इमारत 1975 च्या आसपास बांधली गेली. 1982 साली नवीन भाजी मार्केटची इमारत उभी राहिली. त्यावेळी या दोन्ही मंडईंना कोणतीच नावे नसल्याने जुने आणि नवे भाजीमार्केट अशी ओळख निर्माण झाली. आता मात्र या दोन्ही इमारती नव्याने उभ्या राहणार असल्याने त्या मंडईंना नवीन नावे मिळणार आहेत. जुन्या भाजी मार्केटच्या नवीन इमारतीचे अंदाजपत्रक 3 कोटी रुपयांचे असून तळमजला आणि त्यावर दोन मजल्यांची इमारत बांधली जाणार आहे. नवीन भाजी मार्केटच्या नवीन इमारतीचे अंदाजपत्रक सुमारे 2 कोटी रुपये असून ही इमारत तळमाळा आणि त्यावर एक मजला आहे. जुनी इमारत पूर्णपणे पाडून झाली असून नवीन भाजीमार्केटची इमारत पाडण्याचे काम सुरु झाले आहे