ग्रंथाली’ची विज्ञानधारा आणि आरोग्ययात्रा चिपळूण आणि रत्नागिरी येथे

0
22

चिपळूण ः ग्रंथालीने महाराष्ट्रात वाचनप्रसाराचे कार्य सुरू केले त्याला आता 49 वर्षे झाली आहेत. पुढील 25 डिसेंबरमध्ये ग्रंथाली 50 वर्षे पूर्ण करेल. ग्रंथालीने मराठीत मोलाचे साहित्य निर्माण केले. गेल्या तीन वर्षांत वाचनासह यूट्यूब चॅनेल निर्माण करून उत्तम विषयांवर व्हिडीओ तयार केले आणि ‘लिसन ग्रंथाली’ या माध्यमातून सकस कथांची ऑडिओ क्लिप तयार करून याही माध्यमांत प्रवेश केला. ज्ञानप्रसाराच्या याच भूमिकेतून, कोविडनंतर उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करून ‘ग्रंथाली’ने महाराष्ट्रात सुरुवात म्हणून बारा जिल्ह्यांत आरोग्य आणि विज्ञानजागृती करण्यासाठी विशेष यात्रा योजली आहे. आरोग्य आणि विज्ञान हे आपल्या जगण्याचे महत्त्वाचे घटक आहेत. त्याचे भान राखल्यास आपले व समाजाचे आरोग्य चांगले राखता येईल. ख्यातनाम डॉक्टरांची मुलाखत, परिसंवाद, वर्कशॉप, व्याख्यान आणि ‘विज्ञानधारा’अंतर्गत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद हे यात्रेचे स्वरूप असणार आहे.
लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिर, भावार्थ, घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दैनिक सागर आणि वैष्णो व्हिजन यांच्या सहयोगाने चिपळूण येथे या यात्रेचे उद्घाटन 24 नोव्हेंबर 2023 रोजी, सकाळी 10 वाजता, लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिर येथे होणार आहे. विज्ञान व आरोग्यविषयक माहिती देणारी पोस्टर आणि पुस्तकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रख्यात प्लास्टिक सर्जन डॉक्टर रविन थत्ते यांच्या हस्ते होईल. आरोग्ययात्रेचे नेतृत्व मुंबईतील विख्यात डॉ. सतीश नाईक, डॉ. हेमंत जोशी आणि डॉ. राजेंद्र आगरकर, डॉ. यश वेलणकर आणि डॉ. नीना सावंत करणार आहेत. विज्ञानयात्रेचे नेतृत्व भाभा अणुसंशोधन केंद्राचे निवृत्त शास्त्रज्ञ, पद्मश्री डॉ. शरद काळे आणि डॉ. सुधीर व नंदिनी थत्ते करणार आहेत.
यामध्ये तिन्ही दिवस डॉक्टर महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांना सकाळ व दुपारची अशी दोन सत्रे आपल्या आरोग्यविषयक समस्यांवर मार्गदर्शन करतील. तर डॉक्टर शरद काळे शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानविषयक मार्गदर्शन करणार आहेत.
24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता ‘आरोग्याची कॅप्सुल’अंतर्गत डॉक्टर रविन थत्ते यांची जाहीर मुलाखत डॉ. सतीश नाईक घेतील. 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 ते 1 या वेळेत डॉ. यश वेलणकर पालक/विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप घेतील. यासाठीची नावनोंदणी वाचनालयातील प्रदर्शनात करावी लागेल. सायंकाळी 6 वाजता डॉ. यश वेलणकर आणि डॉ. संजय कलगुटगी ‘जीवनोत्सव’अंतर्गत आपली जीवनशैली व समस्या या विषयी व्याख्यान देतील. तर 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता आरोग्यविषयक परिसंवाद होईल. यात डॉ. राधा मोरे, डॉ. हर्षद होन, डॉ. वाघमारे, डॉ. हेमंत जोशी, डॉ. राजेंद्र आगरकर सहभागी होतील. हे कार्यक्रम लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिर येथे होणार आहेत.
असेच कार्यक्रम रत्नागिरी येथे 24 ते 26 नोव्हेंबर या तीन दिवसांत आयोजित केले आहेत. रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय, नवनिर्माण शिक्षणसंस्था व वैष्णो व्हिजन यांच्या सहयोगाने 24 तारखेला सकाळी 10 वाजता, विज्ञान व आरोग्यविषयक माहिती देणारी पोस्टर आणि पुस्तकांच्या प्रदर्शनाने यात्रेचे उद्घाटन डॉ. अलीमिया परकार यांच्या हस्ते होईल.
24 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत डॉ. यश वेलणकर यांचे वर्कशॉप होईल. त्यासाठी शाळा-कॉलेजचे प्राचार्य आणि शिक्षक नोंदणी करून सहभागी होऊ शकतील. त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजता डॉ. यश वेलणकर आणि डॉ. शाश्‍वत शेरे ‘जीवनोत्सव’अंतर्गत ‘भावनांचे इंद्रधनू – मनोविकार ते मनःस्वास्थ्य’ या विषयी व्याख्यान देतील. 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता ‘मीच होणार माझ्या आरोग्याचा शिल्पकार’ हा परिसंवाद होईल. यात डॉ. अलीमिया परकार, डॉ. रत्ना जोशी, डॉ. नीलेश नाफडे, डॉ. हेमंत जोशी, डॉ. राजेंद्र आगरकर, डॉ. रमेश चव्हाण सहभागी होतील. 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता ‘आरोग्याची कॅप्सुल’अंतर्गत डॉक्टर हिंमतरव बावसकर यांची जाहीर मुलाखत डॉ. सतीश नाईक घेतील. हे सर्व कार्यक्रम रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय येथे होणार आहेत.
रत्नागिरी येथेही डॉक्टर महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांना सकाळ व दुपार अशी दोन सत्रे आरोग्यविषयक मार्गदर्शन करतील. तर डॉक्टर शरद काळे शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानविषयक मार्गदर्शन करणार आहेत.
चिपळूण व रत्नागिरी या दोन्ही ठिकाणचे कार्यक्रम सर्वांसाठी खुले आहेत. आपल्या आरोग्य आणि विज्ञानविषयक जाणिवा व समस्या यावर मार्गदर्शन करणार्‍या या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहावे, दोन्ही ठिकाणी सकाळी 10 ते रात्री 8.30 या वेळेत पोस्टर आणि पुस्तकांच्या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन ग्रंथालीतर्फे सुदेश हिंगलासपूरकर, अरुण जोशी, धनश्री धारप यांनी केले आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here