अंगणवाडी कर्मचारी ४ डिसेंबर पासून राज्यव्यापी बेमुदत संपावर


अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करणे व इतर मागण्या मान्य न झाल्यामुळे ४ डिसेंबर २०२३ पासुन अंगणवाडी कर्मचारी राज्यव्यापी बेमुदत संपावर जाणार आहेत. तसेच माहे नोव्हेंबर २०२३ या महिन्याचा मासिक अहवाल (एम.पी.आर.), मासिक बैठका व इतर माहिती देण्यावर अंगणवाडी कर्मचारी संपूर्ण बहिष्कार घालणार आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. या राज्यव्यापी बेमुदत संपाबाबतची कायदेशीर नोटीस महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समितीच्या वतीने राज्य शासनाला देण्यात आली आहे, अशी माहीती या समितीच्या वतीने कमलताई परुळेकर यांनी कुडाळ येथे दिली.

कृती समितीच्या पदाधिकारी कमलताई परुळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समितीच्यावतीने या राज्यव्यापी संपाबाबत नोटीसीद्वारे राज्य सरकार व संबंधित मंत्र्यांना कळविले आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी भरीव मानधनवाढ, मासिक पेन्शन या व अन्य मागण्यांसाठी संप केला होता व तो केवळ ९ दिवसांत मिटला. त्यावेळेस अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनिसांना अनुक्रमे रु.१५००, १२५०, १००० मानधनवाढ ५ वर्षानंतर होत असल्यामुळे वाढत्या महागाईच्या मानाने फारच अल्प होती. परंतु अन्य मागण्याबाबत विचार करुन कृति समितीने ती मान्य केली. अंगणवाडी कर्मचारी तेव्हा अत्यंत निराश झाल्या व आजही त्या समाधानी नाहीत. अंगणवाडी कर्मचारी गेली ४८ वर्षे इमाने इतबारे कुपोषण निर्मुलनाचे काम करत आहेत. ४० वर्षे सातत्याने सरकार दरबारी लढा देवुन प्रचंड महागाईच्या काळात आता कुठे अंगणवाडी सेविका दहा हजार, मिनी अंगणवाडी सेविका साडेसात हजार व मदतनिस साडेपाच हजारापर्यंत पोहोचल्या आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काम इतर विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाप्रमाणेच महत्वाचे आहे. परंतु शासन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नेहमीच सावत्रपणाची वागणुक देत आले आहे. अशी भावना अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहे. इतर विभागातील कर्मचाऱ्यांना भरघोस वाढ व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तुटपुंजी वाढ असा दुजाभाव का? असा प्रश्न त्यांना सतावत आहे, असे कमलताई परुळेकर यांनी म्हटले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button