शॉर्ट सर्किट होवून पोलीस अधीक्षक कार्यालयातील अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या दालनाबाहेर आग, कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी तात्काळ आग विझवली
रत्नागिरीः- शुक्रवारी दुपारी शॉर्ट सर्किट होवून पोलीस अधीक्षक कार्यालयातील अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या दालनाबाहेर आग लागल्याने पोलीस अधीक्षक कार्यालयात खळबळ उडाली. कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवत वीज पुरवठा खंडीत करुन अग्निशमन सिलेंडच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर तात्काळ पालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. तोपर्यंत आग अटोक्यात आली होती.
शुक्रवारी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक सौ. जयश्री गायकवाड ह्या जेवण करण्यासाठी आपल्या निवासस्थानी गेल्या होत्या. कर्मचारीही जेवण करण्यासाठी बसलेले होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक दालनातून धूर बाहेर येवू लागला. काही वेळात धूराचे प्रमाण वाढले. दालनातील धूर मोठ्याप्रमाणात अधीक्षक कार्यालया आवारातील मोकळ्या जागेत आल्यामुळे कुठे तरी आग लागल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले.
त्यानंतर सर्वच कर्मचाऱ्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या दालनाच्या दिशेन धाव घेतली. यावेळी दालनाला लागून असलेल्या खोलीत शॉर्ट सर्किट होवून इलेक्ट्रीक वायर पेटलेल्या असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यातील एका कर्मचाऱ्यांने सतर्कता दाखवत वीज पुरवठा खंडीत केला. त्यानंतर वायरने पेट घेतलेल्या ठिकाणी अग्निशमन सिलेंडच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात कर्मचाऱ्यांना यश आले.
www.konkantoday.com