महाडच्या रोशनी पारधीची राज्य क्रिकेट संघात निवड
महाड येथील पा. म. थरवळ कन्या विद्यालयात नववीत शिकणारी रोशनी पारधी हिची १५ वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे. रोशनीचे आईवडील उदरनिर्वाहासाठी महाडमध्ये हातगाडीवर कच्छी दाबेली व्यवसाय करतात.दक्षिण रायगडमधून निवड होणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू आहे. लहानपणापासूनच रोशनीला क्रिकेटचे वेड होते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत रोशनीच्या वडिलांनी मुलीच्या ध्येयपूर्तीसाठी प्रचंड मेहनत घेतली. तिला सुरुवातीला बशीर चिचकर यांच्या एसबीसी स्पोर्ट क्रिकेट अकॅडमीमध्ये दाखल केले.
चिचकर यांनी तिच्यातील कलागुण हेरून तिला विनामोबदला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. तिचे प्रशिक्षक आवेश चिचकर यांनीही तिच्यावर सहा वर्षांपासून प्रचंड मेहनत घेतली आहे. रोशनी एक अष्टपैलू खेळाडू असून तिने स्थानिक व जिल्हास्तरीय सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. नाशिक येथे झालेल्या जिल्हास्तरीय सामन्यात तिने झळकावलेले शतक हे तिच्या कारकिर्दीला वळण देणारे ठरले आणि तिची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली.
महाडसारख्या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी पुरेशी मैदाने उपलब्ध नसताना चिचकर यांनी बारा वर्षांपूर्वी स्वत:च्या जागेवर मैदानाची निर्मिती करून अकादमी सुरू केली. त्यांच्या अकादमीतील आरूष कोल्हे, साई भिलारे, रोशन तायडे, तहा चिचकर या मुलांसह काजल साळुंखे, प्रचिती जाधव या दोन मुली रायगड जिल्हा संघातून खेळत आहेत. सध्या रोशनी महाराष्ट्र संघातून खेळण्यासाठी हरियाणा येथे गेली असून तमिळनाडू, बिहार, बंगाल व सिक्कीम या संघाबरोबर महाराष्ट्राचे सामने होणार आहेत.
www.konkantoday.com