विराट कोहलीची ५०व्या वनडे शतकाला गवसणी


*सचिन तेंडुलकरच्या अविश्वसनीय ४९ वनडे शतकांचा विक्रम मोडत विराट कोहलीने वर्ल्डकप स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनल लढतीत ५०व्या शतकाला गवसणी घातली. लॉकी फर्ग्युसनच्या चेंडूवर धाव घेत विराटने हा विक्रम नावावर केला.
काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराटने सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली होती. बुधवारी मुंबईत उष्ण आणि आर्द्र वातावरणातही विराटने संयमी खेळ करत खणखणीत शतकाची नोंद केली.

विराटचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं ८० वं शतक आहे. कसोटी प्रकारात विराटच्या नावावर २९ तर ट्वेन्टी२० प्रकारात एका शतकाची नोंद आहे. २००९ मध्ये विराटने वनडे कारकीर्दीतील पहिल्यावहिलं शतक झळकावलं होतं. १४ वर्षानंतर विराटने वनडे शतकांचं अर्धशतक पूर्ण केलं आहे. विराटचं वनडेतलं न्यूझीलंडविरुद्धचं हे सहावं शतक आहे. मायदेशातलं कोहलीचं हे २२वं शतक आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी दिलेल्या ७१ धावांच्या सलामीनंतर रोहित बाद झाला. विराटने नेहमीप्रमाणे एकेरी दुहेरी धावांसह डावाला सुरुवात केली. प्रचंड उकाड्यामुळे विराटलाही क्रॅम्प्सचा त्रास जाणवला मात्र या कशानेही त्याच्या एकाग्रतेवर परिणाम झाला नाही. वर्ल्डकप स्पर्धेत बाद फेरीच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी नसणाऱ्या विराटने या शतकासह सगळं अपयश धुवून काढलं. शतकानंतर मैदानात उपस्थित मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कुर्निसात करत विराटने ५०वं शतक साजरं केलं.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button