उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघावरून शिवसेनेचे नेते खासदार गजानन कीर्तिकर आणि शिवसेनेचेच दुसरे नेते रामदास कदम यांच्यात चांगलीच जुंपली आहे.कीर्तिकर लढणार नसतील तर उत्तर पश्चिम मुंबईलोकसभेची जागा माझ्या मुलाला सोडावी, अशी मागणी रामदास कदम यांनी केली होती. त्याला गजानन कीर्तिकर यांनी कडाडून विरोध केला होता. आपण लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचं कीर्तिकर यांनी स्पष्ट केलं होतं. त्यावर तुम्ही लढा. पण दुटप्पीपणा करू नका, पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसू नका, असा पलटवार रामदास कदम यांनी केला आहे.
रामदास कदम यांनी मीडियाशी संवाद साधताना हा हल्ला चढवला आहे. गजाभाऊ तुम्ही निवडणुकीला जरूर उभे राहा. तुमचा मुलगाही तुमच्या मतदारसंघात उभा राहणार आहे. त्यामुळे उभं राहिल्यानंतर लढा. फक्त फॉर्म भरून घरात बसू नका. पक्षाची बेईमानी होणार नाही याची काळजी घ्या. तुम्हाला विरोध करण्याचं काही कारण नाही. तुम्ही शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहात. एकाच ऑफिसमध्ये बाप आणि बेटा बसतात. एकाच ऑफिसमध्ये बसून दोघे काय करतात हे सगळी दुनिया बघतेय. मुलाला तिकडून उभं करायचं. तुम्ही फक्त फॉर्म भरायचा आणि मुलाला बिनविरोध निवडून आणायचं असा प्रकार होणार नाही याची काळजी घ्या. पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसू नका एवढीच तुम्हाला हातजोडून विनंती आहे, असं रामदास कदम म्हणाले.
www.konkantoday.com