
कोव्हिड लसीसाठींची मागणी कमालीची घटल्याने राज्यात मुदत संपलेल्या १३ लाख ४० हजार डोस नष्ट
कोव्हिड लसीसाठींची मागणी कमालीची घटली असल्याने राज्यात मुदत संपलेल्या १३ लाख ४० हजार डोस नष्ट करावे लागले आहेत. नष्ट केलेल्या डोसची एकूण किंमत जवळपास २६ कोटी इतकी आहे.यामध्ये कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड, कोर्बव्हॅक्स या तीन प्रकारच्या लसींचा समावेश आहे.
जानेवारी २०२१मध्ये राज्याला १२ कोटी २ लाख कोव्हिशिल्डच्या लसी, २ कोटी ८९ लाख कोव्हॅक्सिन आणि सत्तर लाख कोर्बव्हॅक्सच्या लसी पुरवण्यात आल्या होत्या. राज्यात ९ कोटी १४ लाख इतके नागरिक कोव्हिडीवरील लस घेण्यासाठी पात्र होते. यातील ९२ टक्के लोकांनी पहिला डोस घेतला, तर ८५ टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला तर फक्त २० टक्के नागरिकांनी बुस्टर डोस घेतला. बुस्टर डोस घेण्यासाठी पात्र असलेल्या जवळपास ९ कोटीवर लोकांनी अजूनही हा डोस घेतलेला नाही. विशेष म्हणजे १ कोटी लोकांनी पहिला डोसही घेतलेला नाही, असे हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने दोनशे रुपयांना एक डोस विकत घेतला होता, म्हणजेच जवळपास २६ कोटी रुपयांचे डोस वाया गेले आहेत.
www.konkantoday.com