
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर वारगाव येथे स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाची, चोरट्या दारू वाहतुकीवर कारवाई ५८ लाखाच्या दारूसह ६९ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावरील वारगाव येथे स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने चोरट्या दारू वाहतुकीवर कारवाई केली. यात सुमारे ५८ लाखाच्या दारूसह ६९ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस कॉन्स्टेबल यशवंत आरमारकर हे महामार्गावर पेट्रोलिंग करत असताना महामार्गावरील वारगाव येथील राजधानी धाब्याजवळ गोवा ते मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रक (केअे २५ सी ८३४३१) उभा असलेला आढळून आला. या ट्रकमधून गोवा बनावटीची दारू वाहतूक होत असल्याचा संशय आल्याने आरमारकर यांनी याबाबतची माहिती वरिष्ठांना दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक शेळके, जामसंडेकर आणि जामदार रात्री दीडच्या सुमारास वारगाव येथे दाखल झाले.दरम्यान उभ्या असलेल्या ट्रकजवळ चालक अथवा क्लिनर तेथे आढळून आले नाहीत. त्यामुळे अन्य खासगी चालकाच्या माध्यमातून हा ट्रक कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आला. या ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये रॉयल ब्ल्यू व्हीस्कीचे १२०० बॉक्स आढळून आले. या सर्व दारू साठ्याची किंमत ५७ लाख ६० हजार रूपये आहे. विना परवाना गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्या प्रकरणी पोलीसांनी १२ लाख रूपये किंमतीचा ट्रक (केअे २५ सी ८४३१) आणि गोवा बनावटीची दारू जप्त केली.
www.konkantoday.com