श्रीराम मंदिरातील भजनी कलावंत मेळाव्यात विठ्ठल नामाची शाळा भरली, तहानभूक हरपली…
रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी येथील श्रीराम मंदिरात दिनांक 4 नोव्हेंबर रोजी भजन कला अभ्यासक बुवा प्रकाश वराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या पाचव्या भजनी कलावंत मेळाव्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. मेळाव्यात विठ्ठल नामाची शाळा भरली आणि नामाच्या गजराने जणू तहान भूक हरली, अशा पद्धतीने भजनी मंडळी भक्तीरसात दंग झाली होती. भजनी कलावंतांनी विशेषता महिला कलावंतांनी भजन आणि अभंग गायनासाठी उत्स्फूर्त सहभाग दिला. भजनी प्रेमींच्या आग्रहानुसार भजन मार्गदर्शक बुवा प्रकाश वराडकर यांनी शनिवार दिनांक 9 डिसेंबर रोजी होणाऱ्या सहाव्या मेळाव्यात मार्गदर्शनासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण स्वीकारले आहे.
याप्रसंगी श्रीराम मंदिर जेष्ठ नागरिक कट्टा तर्फे संयोजक अण्णा लिमये सचिव सुरेंद्र घुडे, निवृत्त माहिती अधिकारी तथा कट्टाचे प्रसिद्धी प्रमुख प्रभाकर कासेकर यांनी भजनी कलावंतांचे स्वागत केले. भजनी बुवा पत्रकार प्रकाश वराडकर यांनी आपल्या दुसऱ्या मार्गदर्शन मेळाव्यात सुमारे तासभर चालणाऱ्या पारंपारिक भजनामध्ये पूर्वार्ध आणि उत्तरार्धात कोणत्या क्रमाने अभंग, गजर, गवळण भारुड अथवा कव्वाली म्हणावी तसेच पुन्हा गजर म्हणून पसायदानाने भजनाचा समारोप कशा पद्धतीने करावा याचे विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच स्वतः प्रार्थना, शिव हरहर, रूपावली, गजर, त्यानंतर उत्तरार्धात अभंग, गवळण, गजर सादर केला.
याप्रसंगी महिला भजनी बुवा शुभांगी वारेकर यांनी हार्मोनियम साथ दिली. मृदुंग साथ सुरेंद्र मुळे यांनी तर झांज साथ संजय मेस्त्री आणि टाळ साथ रमाकांत पांचाळ यांनी केली. सुमारे तीन तास रंगलेल्या या भजनी मेळाव्यात आकाशवाणी कलावंत श्रीमती अनुया बाम, बुवा रमेश गोवेकर, डोंगरे बुवा, श्रीमती मयुरी जोशी, नीला पवार, श्रीमती प्रेरणा विलनकर, दत्ताराम लिंगायत, परशुराम कुंभार, दिलीपराव साळवी, मुंबईतील भजन प्रेमी सुभाष धर्माजी चव्हाण यांनी अभंग, भजन, गवळण या प्रकारातील भजनी गीते सादर केली. हा कार्यक्रम खुप रंगला.
मेळाव्याच्या समारोप प्रसंगी सुप्रसिद्ध भजन सम्राट बुवा भगवान बुवा लोकरे यांच्या पत्नी सौ. भावना लोकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
www.konkantoday.com