रत्नागिरीत ग्राहक पेठच्या दिवाळी प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन


रत्नागिरी : खास दिवाळीनिमित्त टीआरपी येथील अंबर हॉलमध्ये रत्नागिरी ग्राहक पेठ आयोजित महिला उद्योगिनी, बचत गटांच्या वस्तू विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी प्रसिद्ध उद्योजिका सौ. स्वरूपा सरदेसाई आणि रत्नागिरी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापिका सौ. विद्या कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला ग्राहक पेठच्या संस्थापिका प्राचीताई शिंदे आणि माजी नगरसेविका सौ. शिल्पा सुर्वे व्यासपीठावर उपस्थित होत्या.

या वेळी प्रमुख पाहुण्या गणपतीपुळे येथील प्राचीन कोकण आणि मैत्रेयी हॅंडीक्राफ्टच्या संचालिका स्वरूपा सरदेसाई यांनी सांगितले की, महिलांनी उद्योगिनी होताना भोवतालचे मार्केटिंग कसे आहे, आपले व्यक्तीमत्व आणि उपलब्ध साधनसामग्री याचा विचार केला पाहिजे. महिला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. ताणतणाव दूर करण्यासाठी योगा, प्राणायाम, व्यायाम केलाच पाहिजे.

जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापिका विद्या कुलकर्णी यांनी सांगितले की, महिलांकडे अष्टभुजा शक्ती आहे. सर्व प्रकारची कामे एकाच वेळेला करू शकतात. व्यवसाय सुरू केल्यानंतर महिला त्याकडे अन्य उत्पन्नाचा मार्ग म्हणून पाहतात. त्याऐवजी मुख्य उत्पन्न स्रोत म्हणून पाहावे. महिलासुद्धा कुटुंबप्रमुख होऊ शकतात. शासनाकडून महिला उद्योगिनींसाठी अनेक योजनांद्वारे सबसिडी उपलब्ध आहे. आम्ही अधिकारी नसून लोकसेवक आहोत. उद्योजकांनी येऊन माहिती घ्यावी आणि उद्योजक बनावे.

कार्यक्रमात माजी नगरसेविका शिल्पा सुर्वे यांनी प्रदर्शनाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. संध्या नाईक यांनी गणेशवंदना सादर केली. शकुंतला झोरे यांनी आभार मानले. प्रास्ताविकामध्ये या प्रदर्शनाला मोठी परंपरा लाभली असून नवनवीन महिला उद्योगिनी यात भाग घेऊन आपल्या व्यवसायात यशस्वी झाल्याचे प्राची शिंदे यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कोमल तावडे, संध्या नाईक, राधा भट, स्वाती सोनार, किर्ती मोडक, शुभांगी इंदुलकर, सौ. माळवदे, आदींनी मेहनत घेतली. या प्रदर्शनात आकाश कंदील, पणत्या, रांगोळ्या, उटणे, दिवाळी फराळ, पर्सेस, परफ्युम्स, घरगुती उत्पादने, साड्या, ड्रेस मटेरिअल्स, सौंदर्य प्रसाधने, ज्वेलरी, हॅण्डीक्राफ्ट प्रॉडक्टस्, आकर्षक झाडे अशा प्रकारच्या अनेकविध वस्तू उपलब्ध आहेत.

प्रदर्शनात होणार विविध कार्यक्रम
प्रदर्शनादरम्यान उद्या (ता. ४) दुपारी ४ वाजता सायबर गुन्हेविषयी मार्गदर्शन पोलीस निरिक्षक स्मिता सुतार, निशा केळकर करतील. ५ ला दुपारी ३.३० वाजता आर्ट ऑफ लिव्हिंग हेल्थ अॅण्ड हॅपिनेस वर्कशॉपद्वारे रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे व तणावमुक्त आनंदी जीवन जगण्याची गुरुकिल्ली याचे मार्गदर्शन केले जाईल. ६ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता गर्भसंस्कार काळाची गरज यावर डॉ. सौ. मंजिरी जोग व्याख्यान देतील. ७ ला सायंकाळी ५.०० डायमंड परफॉरमिंग ऑर्ट अकॅडमी डान्स ग्रुपचा नृत्य कार्यक्रम, बक्षीस वितरणाने सांगता होईल.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button