
स्वातंत्र्य दिनानिमित्त जीजीपीएसमध्ये ट्राय सायकल रॅली
रत्नागिरी : देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी लढा दिला त्यांना वंदन म्हणून आणि स्वातंत्र्याचा आनंद म्हणून जीजीपीएसच्या ‘स्वामी स्वरूपानंद प्री प्रायमरी विभागाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये शाळेने ट्रायसायकल रॅलीचे आयोजन केले होते. रॅलीची सुरुवात ‘भारत माता की जय’ या घोषवाक्याने झाली.
विद्यार्थी आपली सायकल घेऊन शाळेत उपस्थित होते. याचबरोबर विद्यार्थी वेगवेगळ्या स्वातंत्र्यवीरांच्या वेशभूषा परिधान करून आले होते. त्यांच्याबद्दल त्यांनी भाषणेही दिली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाणी गायली, नृत्य सादर केले. आपल्या देशाला स्वातंत्र्य कसे मिळाले हे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे पांढऱ्या,केशरी आणि हिरव्या रंगाच्या टोप्या घालून तिरंग्यास वंदन दिले.
या कार्यक्रमात पावसाच्या जोरदार सरींची सोबत होतीच; परंतु तरीही पालकांचा प्रचंड प्रतिसाद आणि सहकार्य या कार्यक्रमास लाभले त्यामुळे कार्यक्रम खूपच उत्साहात पार पडला. याचबरोबर या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली पाटणकर, प्राथमिक विभागाच्या सौ. अपूर्वा मुरकर, प्री प्रायमरी विभागाच्या सौ. शुभदा पटवर्धन, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.