डिझाईननंतर बहाद्दूरशेख नाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुलाचा भाग काढणार
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहाद्दूरशेख नाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुलाचा भाग आणि त्यावरील लॉंचर अजूनही काढलेले नाही. कोसळलेल्या पुलाचा भाग काढण्याबाबत आता डिझाईन तयार करण्याचे काम सुरू असून ते तयार होवून त्याला मंजुरी मिळाल्यानंतरच काम सुरू केले जाणार आहे. दरम्यान केंद्रीय तज्ञ चौकशीचा अहवालही अद्याप महामार्गाला प्राप्त झालेला नसल्याने उड्डाणपुलाच्या एकूणच सर्व कामाला विलंब लागणार असल्याचे चित्र आहे.
महामार्गावर शहरातून जात असलेल्या उड्डाणपुलाचे काम सुरू असतानाच १५ दिवसांपूर्वी त्यातील काही भाग लॉंचरसह मधोमध कोसळला. यामुळे महामार्गावरील कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केली जावू लागली. दरम्यान उड्डाणपूल दुर्घटनेनंतर त्याच्या चौकशीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची तज्ञ समिती जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार या समितीत टंडन कन्सल्टींगचे मनोध गुप्ता, हेगडे कन्सल्टींगचे सुब्रमण्य हेगडे या दोन तज्ञांनी दुर्घटनाग्रस्त पुलाची पाहणी करतानाच पुलाचे बांधकाम करणार्यांमधील कंत्राटदार, निरीक्षण करणार्या कंपनीचे अभियंते, अधिकारी यांचे जाब घेतले. कोंडमळा येथे गर्डर बनवले जातात. त्या कास्टींग प्लान्टमध्ये जावून तेथील साहित्याचीही पाहणी करतानाच तेथील संबंधितांचे जाबजबाब घेत चौकशी पूर्ण केली आठवडाभरात या समितीकडून प्राथमिक अहवाल महामार्ग विभागाच्या मुख्य अभियंत्यांना प्राप्त होणार होता. मात्र तो अजूनही प्राप्त झालेला नाही.
www.konkantoday.com