चिपळुणात ‘राज्यवृक्ष’ ‘ताम्हण’चा पहिला वाढदिवस साजरानिसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या जिल्हा शाखेचा उपक्रम


चिपळूण :: महाराष्ट्र सरकारने १९९०मध्ये राज्य वृक्षाचा-फुलाचा दर्जा दिलेले ‘ताम्हण’ वृक्ष आणि त्याच्या फुलाचे दर्शन होणे दुर्मीळ झालेले असताना निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ आणि पर्यावरण महिला सखी मंचच्या जिल्हा शाखेने वरिष्ठ कार्याध्यक्ष विलास महाडिक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद शाळा उक्ताडच्या आवारात ‘ताम्हण’सह विविध वृक्षांच्या रोपणाचा उपक्रम राबवला होता. यातील ‘ताम्हण’ वृक्षाचा पहिला वाढदिवस आणि पर्यावरण मंडळाचा चिपळूण अध्यक्षा केंद्रप्रमुख सौ. शैलजा आखाडे-लांडे यांचा सेवानिवृत्ती सत्कार कार्याक्रम शाळेचे विद्यार्थी-शिक्षक, पर्यावरण मंडळाचे पदाधिकारी आणि पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच साजरा करण्यात आला.

वाढदिवसाच्या निमित्ताने एक वर्षाच्या ‘ताम्हण’ झाडाला गोंड्याच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. वृक्षावर मुलांच्या आवडीचा विचार करून फुगे टांगण्यात आले होते. वृक्षाच्या बुंध्याजवळ रांगोळी काढण्यात आली होती. यावेळी ‘ताम्हण’ वृक्षाचे पूजन करण्यात आले. ‘ताम्हण’चे फूल दुर्मीळ झाले आहे. मुंबई, कोकण, नागपूर भागात ताम्हण वृक्ष आढळून येतो. एप्रिल ते जून कालावधीत राणी रंगातील आकर्षक फुलांनी ताम्हणचा वृक्ष बहरलेला दिसतो. जणू महाराष्ट्र दिनी सर्वत्र चैतन्यमय वातावरण असताना रणरणत्या उन्हात आपले स्वागत करायला बहरलेला ताम्हण खुणावत राहातो. साधारण १० ते १५ फुट उंचीने वाढणाऱ्या ताम्हण वृक्षाचे लाकूड सागवानाएवढेच महत्त्वाचे मानले जाते. याच्या लाकडाचा वापर कोकणात पूर्वी होडय़ा तयार करण्यासाठी केला जात असे. आरोग्याच्या दृष्टीने ताम्हणला महत्त्वपूर्ण स्थान आहे. पोटाच्या विकारांवर ताम्हण गुणकारी मानले गेले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव धीरज वाटेकर यांनी केले. त्यांनी जैवविविधतेतील ‘ताम्हण’चे महत्त्व आणि सत्कारमूर्ती सौ. आखाडे-लांडे यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी मायावती शिपटे, संगीता गावडे, विलास महाडिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सौ. आखाडे-लांडे यांनी सत्कारास उत्तर देताना आपल्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक भुस्कुटे, कैसर देसाई, श्रीमती उबळेकर, सीमा कदम, किशोर मोहिते, रामभाऊ लांडे, शाळेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, उक्ताड भागातील रिक्षा युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button