अमली पदार्थाची विक्री करून “4 महीने नजरेआड” राहणाऱ्या एका इसमास, खेड पोलीसांनी केली अटक
शिवफाटा टोलनाका ता. खेड येथे, दिनांक १२/०६/२०२३ रोजी रात्री २०.४० वा. च्या सुमारास अनिल शिवराम चव्हाण ऊर्फ अनिल बुवा वय- ५२ रा. खेड याने आपल्या ताब्यात “गांजा” हा अंमली पदार्थ विक्री करिता बाळगल्या स्थितीत मिळून आल्याने त्याच्यावर खेड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. १६५/२०२३ अंमली औषधी द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम 1985 कायदा कलम 8 (क), २० (ब) २ (ब) तसेच भा.दं.वि. संहिता कलम ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या अधिक तपासामध्ये, आरोपी अनिल शिवराम चव्हाण याला सदरचा “गांजा” हा अंमली पदार्थ विक्री करिता सोलापूर जिल्ह्यामधील राहणार संतोष पुंडलिक काळे वय ४७ वर्ष, रा. शिवरत्न नगर, भक्ती मार्ग पंढरपुर हा ठराविक रक्कम प्रती/किलो अशी पुरवीत असलेबाबत निष्पन्न करण्यात आले.
अंमली पदार्थ विक्रीतील आरोपी हे अत्यंत सतर्क असल्याचे व ते त्यांचे साथीदारांची साखळी निर्माण करून अश्या प्रकारचा व्यवसाय करीत असल्याचे अनेकदा दिसून आलेले आहे. त्यांचा व्यवसाय सुकर होण्यासाठी ते बातमीदार देखील नेमत असल्याचे व त्यांच्या या गुन्हेगारी कृत्याच्या साखळीतील एखादा साथीदार पोलीसांच्या तावडीत सापडल्यास त्याबाबतची माहिती ते लगेच प्राप्त करून अत्यंत सावधगिरी बाळगून नजरेआड होण्याची देखील दाट शक्यता नाकारता येत नाही.
या गुन्ह्यातील सहआरोपी संतोष पुंडलिक काळे यास गुन्ह्यात अटक करणे कामी खेड पोलीस ठाण्या मार्फत वेगवेगळ्या वेळी पोलीस पथक पाठविण्यात आले होते परंतु या गुन्ह्यामधील सह आरोपी संतोष पुंडलिक काळे हा देखील, गुन्हा घडल्या पासून असाच सुमारे 4 महीने पोलीसांच्या नजरेआड झाला होता आणि तो देखील आपल्या संपूर्ण परिवारासह!
आरोपी संतोष पुंडलिक काळे याला आपल्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याचे दोषरोप पत्र मा. कोर्ट मध्ये दाखल झाले बाबत माहिती मिळाली होती त्याप्रमाणे त्याने मा. अतिरिक्त सत्र न्यायालय, खेड यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवा याकरिता अर्ज दाखल केला होता परंतु गुन्ह्याच्या तपास कामी आरोपीची पोलीस कस्टडी आवश्यक असल्याने मा. अतिरिक्त सत्र न्यायालय खेड यांनी दिनांक ०२/०९/२०२३ रोजी पाहीजे आरोपी संतोष पुडंलिक काळे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला म्हणून संतोष काळे याने मा. उच्च न्यायालय मुंबई येथे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला. हा अटकपूर्व जामीन अर्ज मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी देखील २७/०९/२०२३ रोजी नामंजूर केला म्हणून संतोष काळे याने मा. सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथे अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला परंतु मा. सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांनी देखील १६/१०/२०२३ रोजी सदरचा अर्ज फेटाळून निकाली काढला.
आपली अटक टाळण्याकरिता करण्यात आलेले सर्व मार्ग बंद झाल्यानंतर संतोष काळे याला खेड पोलीस ठाणे येथे हजर होणे आवश्यक होते परंतु तसे न करता तो परस्पर दिनांक 26/10/2023 रोजी मा. न्यायालया समोर हजर झाला परंतु मा. न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली.
मा. न्यायालयाकडे, खेड पोलीस ठाणे मार्फत आरोपीचा ताबा मिळवण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला व आरोपी संतोष पुंडलिक काळे वय ४७ वर्ष, रा. शिवरत्न नगर, भक्ती मार्ग पंढरपुर, जिल्हा सोलापूर यास ताब्यात घेण्यात आले.
मा. न्यायालय, खेड यांनी आरोपी संतोष पुंडलिक काळे यास दिनांक 07/11/2023 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे तसेच सदरची कारवाई, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. जयश्री गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी खेड श्री. राजेद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस ठाणे येथील खालील नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
1) पोलीस निरीक्षक, श्री. नितीन भोयर,
2) पोकॉ/१२९१ अजय कडू व
3) पोकॉ/ ९६२ ओहोळ
www.konkantoday.com