कोतवाल पदाची झालेली ही परीक्षा संशयास्पद?
लांजा तालुक्यात झालेली कोतवाल भरतीमध्ये तलाठ्यांच्या हाताखाली काम करणार्या मुलांना अव्वल गुण मिळाले आहेत. त्यामुळे कोतवाल पदाची झालेली ही परीक्षा संशयास्पद असल्याचा आरोप करत या निवड प्रक्रियेला तात्काळ स्थगिती देवून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी लांजा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) यांच्यावतीने करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन २६ ऑक्टोबर रोजी लांजा तहसिलदारांमार्फत जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले. या निवेदनात राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अभिजित राजेशिर्के यांनी म्हटले आहे की नुकतीच कोतवाल भरतीसाठी परीक्षा घेण्यात आली त्यामध्ये लांजात अनेक मुलांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल पाहता ज्यांना जास्त गुण मिळले आहेत ते सर्व महसूल विभागात कंत्राटी पद्धतीने कार्यरत असल्याचे निदर्शनास आले आहे.