रवींद्र चव्हाण आणि आमदार वैभव नाईक यांच्या जवळीकेमुळे निलेश राणे नाराज?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव, माजी खासदार निलेश राणे यांनी सक्रीय राजकारणातून बाजूला होत असल्याची घोषणा केली आणि राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. २००९ ते २०१४ अशी पाच वर्षं निलेश राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते.परंतु, २०१४ च्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांनी त्यांचा पराभव केला होता. निलेश राणे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून कोकण पट्ट्यात सुरू झाली होती. मात्र, दसऱ्याच्या दिवशी निलेश राणेंनी अचानक राजकारणातून एक्झिटची घोषणा केली.
आंगणेवाडी जत्रेवेळी भाजपाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांनी या मोर्चाचे आयोजन केले होते. त्यात कोकणातील ग्रामपंचायतीपासून नगरपालिकांपर्यंतच्या लोकप्रतिनिधींना व्यासपीठावर उभं केलं होतं. तेव्हा देवेंद्र फडणवीसांसमोर रवींद्र चव्हाणांनी, ‘ही आपली ताकद आहे’, असं म्हटलं होतं. त्यावर नारायण राणेंनी उघडपणे भाष्य करत, ‘ही गर्दी ६ महिन्यांची नव्हे तर गेल्या ३३ वर्षांपासून मी गावागावात, घराघरापर्यंत पोहचलो’, अशा शब्दांत कान टोचले होते. सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि राणे कुटुंबात गेल्या काही महिन्यांपासून कुरबुरी सुरू असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर होते.
सिंधुदुर्गात राणे समर्थकांना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून डावललं जातंय, अशी चर्चाही आहे. मध्यंतरी ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमानिमित्त सिंधुदुर्गात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे मोठमोठे बॅनर्स झळकले होते. त्यात राणे समर्थकानेलावलेले होर्डिंग्स पालकमंत्र्यांनी काढायला लावल्याचं बोललं जातं. पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि राणे यांच्यात अंतर्गत नाराजी असल्याची माहिती आहे. कुडाळ-मालवण मतदारसंघातून निलेश राणे निवडणुकीसाठी तयारी करत होते. या ठिकाणी विद्यमान आमदार वैभव नाईक हे ठाकरे गटाचे आहेत. वैभव नाईक यांचे रवींद्र चव्हाणांसोबत चांगले संबंध आहेत. कुडाळ-मालवण मतदारसंघातील कामांसाठी रवींद्र चव्हाण आणि आमदार वैभव नाईक यांच्या अनेकदा भेटी होत असतात. यात काही बंद दाराआड बैठकीही होत असल्याचं सांगितलं जातं.
www.konkantoday.com