रत्नागिरी शहरातील पाणीपुरवठा आठ दिवसात सुरळीत होणार ः नगराध्यक्ष प्रदीप साळवी

रत्नागिरी ः रत्नागिरी शहरात मुसळधार पाऊस पडत असला तरी शहरातील नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. परंतु त्याला नैसर्गिक कारणे असून एमआयडीसीकडून पाणी खेचणारे पंप चिखलात गेले आहेत. तसेच शीळ धरणाची पाईपलाईन डॅमेज झाली आहे. तसेच पानवल धरणाची लाईनही नादुरूस्त झाल्यामुळे शहराला पाहिजे त्या प्रमाणात पाणी उपलब्ध होत नसल्याने शहराच्या विविध भागात नागरिकांना पाणी पुरविणे कठीण होत आहे. मात्र येत्या आठ दिवसात हा पाणी पुरवठा सुरळीत होईल असे नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी सांगितले.
इतर शहराप्रमाणे रत्नागिरी शहरालाही अतिवृष्टीचा फटका बसला असून त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला आहे. त्यातून रत्नागिरी नगर परिषद मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहे. शीळ धरणाचा प्रश्न सोडविण्यासाठी गेले चार ते पाच दिवस नगर परिषदेचे कर्मचारी प्रयत्न करीत असून उद्यापासुन त्या ठिकाणी पाणी येण्यास सुरूवात होईल.
शीळ धरणाची पाईपलाईन परत एकदा फुटल्याने पाणी बंद झाले होते. तेथेही काम सुरू आहे. ज्या भागात पाणीपुरवठा होत नाही त्या भागात नगर परिषद टँकरनेही पाणी पुरविण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु नादुरूस्त असलेल्या टँकरमुळे तेथेही काही प्रमाणात समस्या येत आहेत. शीळ येथे जाणार्या वीजवाहिन्या जंगलातून गेल्यामुळे तेथे विजेची समस्या वारंवार येते त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा करणार्या टाक्या भरल्या जात नाही त्यासाठी नगरपरिषदेने १ लाख ५६ हजार रुपये खर्चुन शीळ येथे जनरेटर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शीळ येथे वीज खंडीत झाल्यामुळे जी समस्या येत होती ती कमी होणार आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष साळवी यांनी ही माहिती दिली. यावेळी सुहेल मुकादम, बिपीन बंदरकर, श्री. साळवी उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button