
मिर्या बंधार्याचे काम आचारसंहितेमुळे रखडले, पावसाळा तोंडावर आल्याने मिरावासीयांच्यात चिंतेचे वातावरण
रत्नागिरी ः पावसाळा जवळ आल्याने समुद्रकिनारी भागात राहणार्या रहिवाशांना समुद्राच्या अतिक्रमणाची चिंता भेडसावत आहे. मिर्या येथील बंधार्याचे काम लोकसभा निवडणुकीच्या आचार संहितेमुळे सुरू होवू शकले नाही. पावसाळ्यात येथील बंधार्याचे काम करण्यात येईल असे पत्तन विभागाने सांगितले आहे.
समुद्र किनारी भागात समुद्राच्या अतिक्रमणामुळे तेथील नागरी वस्तीला धोका निर्माण झाला आहे. दरवर्षी समुद्राचे अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे पावसाळ्यात किनारी भागातील रहिवाशांना समुद्राच्या अतिक्रमणाची भीती असते. मिर्या येथील परिस्थिती खूप खराब आहे. येथील समुद्राचे पाणी येथील रहिवाशांच्या सातबारावर आले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना पावसाळ्यात जीव मुठीत घेवून रहावे लागते. यापूर्वी मिर्या येथे बंधारे बांधण्यात आले होते. मात्र हे बंधारे समुद्राच्या अतिक्रमणात वाहून गेले. यावर्षी मिर्या येथील बंधार्याचे काम करण्यात येणार होते. परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली. त्यात बंधार्याचे काम थांबले. मिर्या येथील रहिवाशांची मागणी पाहता पावसाळ्यात बंधार्याचे काम करण्यात येणार असल्याचे पत्तन विभागाने सांगितले.