
कुवारबाव येथील मैदानावर कारवाई केलेली कारवाई आकसाने व दबावाखाली- भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचा आरोप
मैदान प्रकरणावरून भाजप व शिंदे गट आमने सामने
कुवारबाव येथील भाजप कार्यालय जवळ उभारण्यात आलेल्या मैदानावर प्रशासनाने कारवाई केली असून या प्रकरणावरून आता भाजपा व शिंदे गट आमने-सामने आले आहेत ही कारवाई शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या दबावामुळे केली असून ही कारवाई करताना भाजपचा झेंड्याचा ही अपमान केला असून संबंधितावर तात्काळ कारवाई करा अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केली आहे
रत्नागिरी, तहसीलदार म्हात्रे यांनी कुवारबाव येथील मैदानावर कारवाई करून ते उदध्वस्त केले. शासकीय जागेमध्ये हे मैदान होते. त्याचा वापर मुले खेळासाठी करीत होती. आम्ही ते मैदान वापरासाठी मिळावे, अशी मागणी केली होती. जिल्हाधिकारी, तहसीलदार त्यासाठी सकारात्मक होते. परंतु शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर दबावाखाली ही कारवाई केली. आमच्या पक्षाचा झेंड्याचाही त्यांनी मान ठेवला नाही. त्यामुळे संबंधितावर कारवाई करावी आणि जाहीर माफी मागावी, अन्यथा आम्ही सक्षम आहोत, असा निर्वाणीचा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी दिला.
या मैदानावर जर कारवाई होत असेल, तर चंपक मैदानावरील गुरांची शेड आणि कुवारबाव येथील अनेक अनधिकृत बांधकामे हटवावी, अशीही मागणी त्यांनी केली. भाजप संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी तालुकाध्यक्ष दादा दळी, सचिव सतेज नलावडे, डॉ. ऋषिकेश केळकर, राजन फाळके, विवेक सुर्वे, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, सुजाता साळवी, दादा ढेकणे आदी उपस्थित होते.
म्हणाले, कुवारबाव येथे शासनाच्या रिकाम्या जागेत स्थानिकांच्या परवानगीने आणि श्रमदानातून हे मैदान बांधले होते. काही ठिकाणी ढासळण्याची शक्यता असल्याने ते बांधून घेण्यात आले. ग्रामपंचायतीसह गावातील चारशे लोकांच्या स्वाक्षरीचे निवेदन देऊन आम्ही एखाद्या संस्थेच्या नावे हे मैदान करून ते वापरात द्यावे, अशी मागणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत भेटलो होतो. स्थानिक लहान, मोठी मुले विविध खेळ येथे खेळणार होते. अनेक कार्यक्रम तेथे करता येतील. सर्वांसाठी ते खुले ठेवण्याचा आमचा प्रयत्न होता. त्याला जिल्हाधिकारी, तहसीलदारांनीही सकारात्मकता दर्शविली होती. परंतु याबाबत शिंदे शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने याबाबत तक्रार केली. हे कोणाच्या खासगी जागेत नव्हेत, त्यामुळे त्यांचा तक्रार करण्याचा संबंध नव्हता. तरी त्याची दखल घेऊन सकारात्मक असलेल्या तहसीलदारांनी कारवाई केली. तहसीलदार श्री. म्हात्रे यांनी जेसीबीने हे मैदान उदध्वस्त केले. हे करताना भाजपच्या झेंड्याचाही मान ठेवला नाही. ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक गोष्ट आहे. संबंधितांने याबाबत तत्काळ जाहीर माफी मागावी, अन्यथा आम्ही सक्षम आहोत.
शासकीय जागेत बांधलेले हे मैदान आम्ही अधिकृत आहे, असे म्हणतच नाही. परंतु आकसाने आणि दबावाखाली अशी कारवाई होणार असेल तर चंपक मैदानातील गुरांसाठी बांधलेली निवारा शेडही हटवावी. तसेच मैदानाच्या आजुबाजूला अनेक अनधिकृत बांधकामे आहेत, ती तोडावी, अशी मागणी श्री. सावंत यांनी केली आहे त्यामुळे या प्रकरणावरून वाद चिघळण्याची शक्यता आहे
www.konkantoday.com