
कोकणात चार क्रूझ टर्मिनलना हिरवा झेंडा*
नि सर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणात पर्यटन विकासाच्या दृष्टीकोनातून आंतरराष्ट्रीय पर्यटकांना या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेता यावा यासाठी परदेशी जहाजांसाठी कोकणात चार ठिकाणी क्रूझ टर्मिनल उभारण्यात येणार आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यातील दिधीचाही समावेश आहे. महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे मेरीटाईम मंडळाने या संबंधीचा प्रस्ताव आंतरराज्य जलवाहतूक मंत्रालयाकडे सादर केला होता. त्याला प्राथमिक मान्यता देण्यात आली आहे.निसर्ग संपन्न कोकणात दरवर्षी हजारो देशी-विदेशी पर्यटक भेट देत असतात. अर्थात यात देशी पर्यटकांची संख्या जास्त असते. जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय पर्यटकांना कोकणाकडे आकृष्ट करणे हा क्रूझ टर्मिनल उभारणीमागील हेतू आहे.गोव्याप्रमाणे पर्यटनाच्या दृष्टीने कोकणचे महत्वही तेवढेच वाढले पाहिजे यावर मेरिटाईम बोर्डाने भर देताना या प्रस्तावाची मांडणी केली आहे. कोकणचा निसर्ग, विशाल सागर किनारे, कोकणातील दैनंदिन जीवन, नारळी पोफळी, तसेच आंबा काजूच्या बागा असा अनोखा नजारा पर्यटकांना पाहता यावा, असा मेरिटाईम बोर्डाचा उद्देश आहे. त्यानुसार या प्रस्तावाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. आता मेरिटाईम बोर्डाच्या प्रस्तावाची केंद्रीय मंत्रालयाकडून छाननी केली जाणार आहे. www.konkantoday.com