
नमोच्या शुभारंभाला नाचणी इडली-डोसा भेट,रत्नागिरी आणि चिपळूण येथील स्वयंसहाय्यता समूहाला ऑर्डर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत लवकरच नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला राज्यभरातून दीड लाख महिला उपस्थित राहणार आहेत. या महिलांना समूहातील महिलांनी उत्पादीत केलेल्या नाचणी डोसा, नाचणी इडली पीठ आणि ज्युट बॅग या वस्तू भेट स्वरूपात दिल्या जाणार आहेत. यात दीड लाख पॅकेट आणि बॅग तयार करण्याची ऑर्डर रत्नागिरी आणि चिपळूण येथील स्वयंसहाय्यता समूहाला मिळाली आहे. यासाठी सुमारे साडेपाच टन नाचणी पीठ लागले असून यामध्ये सुमारे ३ हजार महिलांचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासन महिलांच्या सबलीकरणाच्या विविध योजना राबवत आहे. अशा विविध योजनांच्या माध्यमातून हजारो महिलांच्या उपजिविका विकासामध्ये वाढ झाली आहे. असाच एक नवीन उपक्रम म्हणजे नमो महिला सशक्तीकरण अभियान होय. राज्यातील महिलांसाठी हे अभियान राबविण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. या कार्यक्रमासाठी राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत कार्यान्वित असलेल्या सीआरपी व स्वयंसहाय्यता समूहातील सदस्या उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमातील उपस्थित महिलांना समूहातील महिलांनी उत्पादीत केलेल्या भेटवस्तू भेट स्वरूपात देण्यात येणार आहेत.
www.konkantoday.com