आमदार अपात्रतेसंदर्भात न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना सुनावत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले
आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी प्रलंबित आहे. या प्रक्रियेत मुद्दामहून वेळकाढूपणा केला जात असल्याचे आरोप करत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.ठाकरे गटाने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांपूर्वी विधानसभा अध्यक्षांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतरही कार्यवाही न झाल्यामुळे महिन्याभरापूर्वी पुन्हा एकदा न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना सुनावत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तरीही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून योग्य ती पावले उचलण्यात न आल्यामुळे न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी राहुल नार्वेकरांवर सुनावणी प्रलंबित ठेवल्यावरून तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत.
विधिज्ञ सिद्धार्थ जाधव यांनी सर्वोच्च न्यायालयात नेमके काय घडले याबाबत माहिती देताना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना एवढे संतापलेले यापूर्वी पाहिले नव्हते, असे म्हटले आहे. न्यायालयाने सांगितले की, आम्हाला मंगळवारी नवीन वेळापत्रक द्या. हा पोरखेळ सुरु आहे. विधानसभा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत आहेत, असे सरन्यायाधीशांनी म्हटले आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांना समजत नसेल तर तुषार मेहता आणि महाराष्ट्राचे महाधिवक्ता यांनी अध्यक्षांबरोबर बसावे व त्यांना समजावून सांगा की सर्वोच्च न्यायालय काय आहे. आमचे आदेश पाळले गेले पाहिजे, अशा कडक शब्दांत न्यायालयाने ठणकावून सांगितले आहे, असे सिद्धार्थ जाधव यांनी सांगितले.
www.konkantoday.com