श्री रत्नेश्वर ग्रंथालयाचे काम डोंगराएवढे- जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी
नुतनीकृत रुग्णवाहिकेचे लोकार्पण
रत्नागिरी : धामणसे येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाने आता वाचन चळवळ वाढवली आहे. आता डिजिटल स्वरूपातही ग्रंथालयाने सुविधा द्यावी. ग्रंथालयाच्या रुग्णवाहिकेने दुर्गम भागातील ७०० रुग्णांचे प्राण वाचवले. हे डोंगराएवढे मोठे काम आहे. ग्रंथालयाचे संस्थापक कै. शंकरराव कुलकर्णी आणि रुग्णवाहिकेचे देणगीदार कै. तात्या अभ्यंकर यांच्या दूरदृष्टीमुळे हे शक्य झाले. ८४ गावांचा अधिपती श्री रत्नेश्वराच्या कृपेमुळे हे शक्य झाले. चालकांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण द्यावे, यापुढेही हे काम असेच चालू राहावे, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले.
धामणसे येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या नूतनीकृत व ऑक्सिजन सेवेसह सुसज्ज रुग्णवाहिकेचे लोकार्पण केल्यानंतर श्री. कुलकर्णी बोलत होते. ते म्हणाले की, १९७६ साली दुर्गम गावात ग्रंथालय सुरू झाले. आज त्याचा वटवृक्ष झाला आहे. ग्रंथालय चालवणे कठीण असूनही चालवले जात आहे. अलिकडे वाचन संस्कृती कमी झाली असून त्याचे दुष्परिणाम पाहत आहोत. आता डिजिटल स्वरूपातही ग्रंथालयात सुविधा द्यावी. मोबाईल, सोशल मीडियाचे अॅडिक्शन झाले आहे. परंतु वाचन संस्कृती जपण्याचे काम हे ग्रंथालय करत आहे. कोकणाबद्दल आदर वाटतो.
आपण समाजाला काही दिलं पाहिजे, ही मातीची मानसिकता आहे. आता ऑक्सिजनची सेवा दिली आहे. कोविड काळात ऑक्सिजनअभावी अनेकांना प्राण गमवावे लागले. तात्या अभ्यंकर यांचाही मुलगा त्यांचा वारसा पुढे चालवत आहे. ८४ गावांचा अधिपती श्री रत्नेश्वराची कृपा या गावावर आहे. वैद्यकशास्त्रात गोल्डन हवर संकल्पना आहे. अपघात, ब्रेन हॅमरेज, अटॅक आल्यास रुग्णाला ठराविक वेळेत उपचार मिळाले तर प्राण वाचवता येऊ शकतात. ग्रामीण भागात रुग्णवाहिका चालक आणि ग्रामस्थांनाही असे प्रथमोपचाराचे प्रशिक्षण द्यावे. तात्या अभ्यंकरांचे द्रष्टेपण होते. त्यामुळेच ही रुग्णवाहिका त्यांनी दिली. तरुण मंडळी निस्वार्थ पद्धतीने काम करत आहेत. मुंबई, डेरवण, कोल्हापूर, कर्नाटक, चिपळूण, संगमेश्वर, हातकणंगले येथेही रुग्णांना नेण्यात आले. हे महत्वाचे काम आहे, असेही ते म्हणाले.
ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुळकर्णी म्हणाले की, श्री रत्नेश्वराच्या दर्शनासाठी आलेल्या रवींद्र कुळकर्णी यांनी रुग्णवाहिकेसाठी योगदान देऊ, असे आश्वस्त केले. त्यांनी ऑक्सिजन सुविधेसाठी मदत केली. अतुल तुपे यांनी सर्व देखभाल दुरुस्तीसह गाडीचे पार्टही पुणे, कोल्हापूरमधून आणले. आज तात्यांच्या जयंतीदिनी ही कार्यक्रम होत असल्याबद्दल आनंद होत आहे.
सरपंच अमर रहाटे, उपसरपंच अनंत जाधव, श्री रत्नेश्वर ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुळकर्णी, श्री रत्नेश्वर देवस्थान अध्यक्ष श्रीकांत देसाई, माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष दत्ताराम चव्हाण, संचालक प्रशांत रहाटे, विश्वास धनावडे, सौ. स्मिता कुलकर्णी, मुख्याध्यापक अविनाश जोशी, निवेंडी गावचे सतीश सोबळकर, तंटामुक्त अध्यक्ष दीपक जाधव आदी उपस्थित होते. या वेळी देणगीदार (कै.) तात्या अभ्यंकर यांचे सुपुत्र पराग अभ्यंकर यांनी रुग्णवाहिकेसाठी २५ हजार रुपये दिले. देणगीदार व पंचक्रोशीतील सरपंच, संचालक, रुग्णवाहिका चालक आदींचा सन्मान करण्यात आला. पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या समवेत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चिटणीस मुकुंद जोशी यांनी प्रास्ताविकामध्ये ग्रंथालय व रुग्णवाहिका संबंधी माहिती दिली. उपाध्यक्ष विलास पांचाळ यांनी आभार मानले. मी व माझ्या कुटुंबियांच्या अपघाताप्रसंगी याच रुग्णवाहिकेमुळे आमचे प्राण वाचू शकले असे सांगून या उपक्रमाचे कौतुक केले.
www.konkantoday.com