
रत्नागिरी शहरात अजूनही मोकाट गुरांचा वावर,आठवडा बाजारात मोकाट गुरांचा मुक्काम
रत्नागिरी शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणार्या मोकाट गुरांविरूद्ध जिल्हा प्रशासन व रत्नागिरी नगर परिषदेने उपाययोजना सुरू केल्या असून रत्नागिरी शहरात रस्त्यावर बसणार्या मोकाट गुरांना पकडून चंपक मैदान येथे बांधण्यात आलेल्या मोकळ्या कंपाऊंडमध्ये या गुरांना ठेवण्यात येत आहे. शहरातील मोकाट फिरत असलेल्या जवळजवळ ९० च्या वर गुरांवर कारवाई करून त्यांना चंपक मैदान येथे देण्यात आले आहे
मात्र असे असले तरी अजूनही शहरात काही भागात अजूनही मोकाट गुरे फिरत आहेत. मोकाट गुरे पकडण्यासाठी न.प. प्र्रशासनाने पथके तयार केली होती. मोकाट गुरांना पकडून चंपक मैदान येथे नेण्याचे काम या पथकाचे होते. मात्र रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथे सकाळी काही गुरे फिरत असून रत्नागिरी नगर परिषदेचे कर्मचारी या गुरांना हाकलवत कॉंग्रेस भुवनपर्यंत नेतात. मात्र त्यानंतर कर्मचारी निघून गेल्यानंतर ही गुरे परत येत आहेत.
यामुळे आठवडा बाजार परिसरात अजूनही मोकाट गुरे फिरताना दिसत आहेत. गुरांना पकडण्यात नगर परिषदेची पथके कमी पडत आहेत की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. या मोकाट गुरांपैकी काही गुरांना लंपीचीही लागण झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे न.प. प्रशासनाने उत्साहात सुरू केलेली मोकाट गुरे पकडण्याची मोहीम थंडावली की काय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. www.konkantoday.com





