श्रीराम कट्ट्यावरील भजनी मेळाव्यात भजनी कलावंत भक्तिरसात झाले दंग
रत्नागिरी, (प्रतिनिधी) : रत्नागिरी शहरातील श्रीराम मंदिरात दि. ७ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या भजनी कलावंत मेळाव्यात सिंधुदुर्गचे भजन कला अभ्यासक बुवा श्री. प्रकाश वराडकर यांनी भजनी कलेविषयी मौलिक मार्गदर्शन केले. या मेळाव्यात भजनी कलावंतांनी अभंग, भजने, गवळण आणि कव्वाली सादर करून उपस्थितांना भक्तिरसात दंग केले.
प्रकाश वराडकर यांनी भजनी कलेची प्राचीन काळापासून ची परंपरा स्पष्ट करताना त्या काळापासून भजनासाठी वापरल्या जाणाऱ्या भजन साहित्यांचा परिचय करून दिला. आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात संगीतविषयक अनेक नवीन साधने उपलब्ध झाली असली तरी पारंपरिक हार्मोनियम, झांज, पखवाज, टाळ, चाळ यासारख्या भजनी साहित्याची गोडी आणि भक्ती ची धुंदी तसेच या कलेचे वैभव कधीच विसरता येणारे नाही, असे सांगितले. तसेच पखवाज किंवा मृदंग या वाद्याला खुप प्राचीन परंपरा असून त्याची उत्पत्ती कशी झाली याबाबत प्रचलित असलेली पुराणातील कथाही त्यांनी सांगितली.
या भजनी मेळाव्यात रत्नागिरीतील अनेक भजनी कलावंतांनी प्रकाश वराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली भजनात रंगत आणली. बुवा विनायक डोंगरे, श्रीमती शुभांगी वारेकर, राम गोवेकर, विश्वास शेंडे, बाळाजी घोसाळकर, यांच्यासह उत्कर्ष महिला भजन मंडळ, मीऱ्या च्या श्रीमती प्रेरणा विलणकर यांनी अभंग भजन सादर केले. सुरेंद्र घुडे यांनी गवळण, राम गोवेकर यांनी कव्वाली, प्रकाश वराडकर यांनी अभंग आणि नंतर गजराने मेळाव्याची सांगता झाली. रमाकांत पांचाळ यांनी पखवाज साथ केली.
यावेळी श्रीराम कट्टा चे संयोजक सुरेश लिमये आणि सचिव सुरेंद्र घुडे यांनी मेळावा मार्गदर्शक प्रकाश वराडकर यांच्यासह कट्टाचे प्रसिद्धी प्रमुख प्रभाकर कासेकर, निवृत्त डेपो मॅनेजर दिलीपराव साळवी, श्रीराम मंदिर संस्थेचे कोषाध्यक्ष संतोष रेडिज आदींचा मेळाव्याला केलेल्या सहकार्याबद्दल सत्कार केला. पुढील भजनी मार्गदर्शन मेळावा प्रकाश वराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक ४ नोव्हेंबर २०२३ रोजी होणार आहे. श्रीराम मंदिर कट्टा आणि श्रीराम मंदिर संस्थेने भजनी कलावंतांना आणि त्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल यावेळी कृतज्ञता व्यक्त केली.